साताराः वहागाव (ता. कराड) येथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे...
साताराः वहागाव (ता. कराड) येथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून केल्यानंतर शेतात जेसीबीने पंधरा फुट खोल खड्डा काढून मृतदेह पुरून टाकल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी खड्डा खोदून मृतदेह बाहेर आहे. बरकत पटेल (वय 30, रा. वहागाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वहागाव येथील बरकत पटेल हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार चार दिवसांपूर्वी तळबीड पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्याबाबतचा तपास सुरू होता. तपासादरम्यान बरकतच्या पत्नीचे एका युवकाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
बरकतच्या पत्नीचे गावातीलच एका युवकाशी अनैतिक संबंध होते. याबाबतची माहिती बरकतला मिळाली होती. त्यामुळे तो पत्नी व त्या युवकाशी वाद होत होता. पती आपल्या संबंधात अडसर ठरत असल्यामुळे पत्नी व तिच्या प्रियकराने बरकतचा खून केला. यानंतर युवकाने आपल्या शेतात भाडेतत्वावर जेसीबी बोलावून खड्डा खणून घेतला होता. खड्ड्यामध्ये पाण्याची टाकी बांधायची आहे, असे त्याने जेसीबी चालकाला सांगितले होते. खड्डा खोदल्यानंतर बरकतचा खून करुन त्याचा मृतदेह त्या खड्ड्यात टाकला आणि खड्डा बुजवला.
संबंधित प्रकार उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिस उपअधिक्षक डॉ. रणजीत पाटील, तळबीड पोलिस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक जयश्री पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. रात्री उशिरा तहसिलदारांसमोर संबंधित खड्डा खोदून त्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS