पाटणा (बिहार) : लग्नानंतर महिनाभरातच युवतीची हत्या झाल्याची घटना वैशाली जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील त...
पाटणा (बिहार) : लग्नानंतर महिनाभरातच युवतीची हत्या झाल्याची घटना वैशाली जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. काजल पासवान (रा.अफजलपूर) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.
काजलचे गावातील राजेश साहनी याच्यासोबत प्रेमसंबध होते. पण दोघांच्या जाती वेगळ्या होत्या. त्यामुळे दोघांच्या लग्नाला विरोध होता. बेचन पासवान यांनी त्यांची मुलगी काजल हिचे लग्न दुसऱ्याशी लावले होते. पण काजलला हे लग्न मान्य नव्हते. काजलने विवाहानंतरही राजेशशी संपर्क ठेवला आणि लग्नानंतर काही दिवसांनी राजेशसोबत संसार थाटण्याच्या उद्देशाने ती सासरच्या घरातून पळून गेली. दोघांनी 4 मे 2022 रोजी दोघांनी कोर्टात लग्न केले.
लग्न झाल्यानंतर हे दोघंही घरापासून दूर राहत होते. लग्नानंतर महिनाभरानंतर राजेश जूनच्या पहिल्या आठवड्यात काजलला त्याच्या घरी घेऊन आला. मात्र घरच्यांनी काजलला स्विकार करण्यास नकार दिला. काही दिवसानंतर घरच्यांनी दोघांना स्विकारले. काजल पती राजेशसोबत सासरच्या घरी परतली असताना तिचे वडील बेचन पासवान तिला भेटायला आले होते. मात्र, आधीच चिडलेल्या सासरच्या मंडळींनी त्यांना बेदम मारहाण केली. प्रकरण पंचायतीपर्यंत पोहोचलं आणि निकाली काढण्यात आलं. मात्र एक-दोन दिवसांनी काजलची हत्या झाली. या घटनेनंतर सासरचे लोक तिथून पळून गेले. या हत्येची खबर शेजाऱ्यांकडून पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास केला. दरम्यान, काजलचे वडील बेचन पासवानही पोहोचले होते.
बेलसर पोलिस अधिकारी सुनील कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पोलिसांनी हत्येतील आरोपींच्या शोधात छापेमारी सुरू केली. या छाप्यात सासरचे ४ जण पोलिसांच्या हाती लागले असून, पती राजेश साहनी अद्याप फरार आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. राजेश साहनीचा शोध सुरू आहे.'
COMMENTS