मित्र मैत्रिणींनो रोजच मी आपल्याला बातम्या अन गुन्हेगारी जगतांच विश्व दाखवत होतो, चला आज आपल्याला माझ्याबरोबर फेरफटका मारण्यासाठी नेतोय... ...
मित्र मैत्रिणींनो रोजच मी आपल्याला बातम्या अन गुन्हेगारी जगतांच विश्व दाखवत होतो, चला आज आपल्याला माझ्याबरोबर फेरफटका मारण्यासाठी नेतोय...
मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता, म्हणजे जवळ जवळ पाऊस
पडायला एक आठवड्याचा अवधी शिल्लक होता. दादांनी रविवार पाहून घर शेकारायला
घेण्याचा बेत केला. आम्ही मदतीला होतोच, दादा एक एक कौल काढून आमच्या हातात
द्यायचा अन आम्ही ती धुराने काळवंडलेली कौल हाताच्या कोपरे काळे होईस्तोपर्यंत हात
चालवायचो. कारण, पुढे लाकडांचे वासे, तसेच गवताचे व काड्यांचे वमान घालण्यासाठी
वेळ लागायचा म्हणून पटापट आम्ही सगळेच हात चालवत होतो.
ते दिवस म्हणजे अगदी जीवन समाधानाने जगल्याचा खरा आनंद
होत होता, दादांच्या हाताखाली काम करताना व सपरं सुपरं तसेच मातीची घरं व भिंती
घालण्याचा जो आनंद होता. तो काही औरच होता.
असो, तर घरं शेकारून झाल्यावर जो आनंद होता तो वेगळाच
कारण नविन घरकुल केल्यासारखंच व्हायचं. आठवड्यावर पाऊस येऊन ठेपलेला अशातचं शेळ्यांना
देखील एखादा मांडव घालावाच लागायचां म्हणजे घरातून सोडल्यावर किमान मोकळ्या जागेत
त्या उभ्या राहतील अशा पध्दतीचा मांडव घालावा लागायचा.
वाड्यात अन गावात शेळ्यांची काही कमी नव्हती, प्रत्येक
घरटी किमान एखादी तरी शेळी असायची गाया म्हशी बैल हे तर होतेच परंतु ती महत्वाची
लक्ष्मी होती, आज ती लक्ष्मी नाहीशी होत आहे, खरं तर आमच्याच घरात शेळ्या नाहीत,
आणि वाड्यात व गावातही संख्या नगण्यचं झाली.
शेळ्या वळायला साधारण आम्ही वाड्यातील पोरं पोरं सकाळी
10 वाजताच्या दरम्यान सोडायचो दुपारच्या टाईमाला आम्ही सकाळी डबे घेऊन जायचो.
दिवसभर रानोमाळ शेळ्या वळवून आणायचो संध्याकाळी 6 वाजता घरी यायचो. प्रत्येकजण
नाही म्हटला तरी एक सदस्य तरी घरातील असे सर्वजण एकत्र बसायचो गप्पागोष्टी करायचो
त्यातून मोठा आनंद व्हायचा इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता दिवस कसा निघून
जायचा ते कळतही नसायचं मोबाईलची दुनिया नव्हती म्हणून किमान एकमेकांचा संवाद मिळून
मिसळून व्हायचा आज ते दिवस म्हणजे आजच्या काळात टिंगल वाटेल आम्ही पुस्तक घेऊन
शेळ्या वळायचो एक पोतं एक पाण्याची बाटली, जेवणाचा डबा हे आमचं विश्व जगाचा आणि
आमचा तितकासा संबंध नसायचा आम्ही आमच्या विश्वात असल्याने जे समाधान मिळायचं ते
जगाच्या आनंदापेक्षा मोठं असायचं.
पाऊस पडायला सुरूवात झाल्यावर एकमेकांच्या ओट्यावर बसून
आठ चल्लस व कवड्यांचा डाव मांडून खेळत बसायचं. शेताच्या पेरण्या उरकून दुसऱ्या
मालकाच्या इथं लोकं आवडीनं कामाला जायची. आठवड्यातून दोनशे तीनशे रूपये मिळाले तरी
मोठं समाधान होतं. आज मात्र तो आठवड्याचा पगार दोन तीन हजारावर जाऊन ठेपला तरी
लोकं समाधानी नाहीत, कारण महागाईच्या झळांनी लोकं होरपळून चालली आहेत.
मित्र मैत्रिणी व ज्येष्ठांच्या पंगतीला गप्पा गोष्टी
व्हायच्या मात्र एकमेकांना कमी लेखण्याचा कधीच प्रयत्न होत नव्हता, आता मात्र आपण
लगेच प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करत असतो, ज्य़ेष्ठ मंडळींचा शब्द अखेरचा मानून
त्या शब्दाला मान दिला जायचां त्यामुळे एकमेकांचा सुसंवाद व्हायचा आज मात्र
मोबाईलच्या जगात वावरत असताना एकमेकांचा द्वेष, दुजाभाव, वाईट चांगले हे मनात लगेच
भरले जाते. त्यातून मान अपमान या गोष्टींचा भला मोठा शत्रू आपल्या समोर उभा राहतो.
हे मात्र त्या दिवसांत कधीच आम्हाला जाणवलं नाही,
एकमेकांचे सुसंवाद चांगले वाईट आपलेपणा मान अपमान हे नव्हतचं कारण, समाधानी जीवन
जगल्याचा खरा आनंद आजही आठवलं तरी होतो.
मित्रांनो कधी कधी लोकं मला म्हणतात, की, स्टाईल जीवन
जगले पाहिजे. मी तर म्हणतो तुम्हाला ज्यात समाधान व आनंद मिळेल त्याच स्टाईलमध्ये
जगा.
आपण लेखाची सुरूवात वेगळ्या गोष्टीतून केली आणि शेवट
वेगळ्या गोष्टीतून केला आहे.
मात्र तुम्ही वाचकांनी यातून काय बोध घ्यायचा हे तुम्ही
सर्वस्वी ठरवायचं आहे.
माझे विचार मी मांडले आहेत, प्रत्येकाचे विचार आचार मत
मतांतर वेगळी असू शकतात, यात जे घेण्यासारख वाटेल ते जरूर घ्या अन जे पटणार नाही,
ते तुम्ही सोडून द्या, कारण, कुणीही या जगात सर्व गुण संपन्न नाही.
तरी लेख कसा वाटला ही प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू
नका, ती पण चांगली असेल तर उगाच वाह्यात प्रतिक्रिया नको.
लेखक – प्रा. सतिश शिंदे. – क्राईमनामा लाईव मुख्य
संपादक.
COMMENTS