उस्मानाबाद : कामावर ओळख झालेल्या एका विवाहित महिलेशी मैत्री करून नंतर तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना येरमाळा घाटात ज...
उस्मानाबाद : कामावर ओळख झालेल्या एका विवाहित महिलेशी मैत्री करून नंतर तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना येरमाळा घाटात जवळपास सहा वर्षांपूर्वी घडली होती.
या प्रकरणाचा छडा येरमाळा पोलिसांनी लावल्यानंतर अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात बुधवारी झाली. उपलब्ध साक्षी पुराव्याच्या आधारे आरोपीस दोषी ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्या.के.आर. पेठकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शीकडे जाणाऱ्या येरमाळ घाटात २० जून २०१६ रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला होता. येरमाळा पोलिस यांनी शवविच्छेदन अहवालाच्या आधारे स्वतः फिर्यादी होत खुनाचा गुन्हा दाखल केला होता, यानंतर पहिल्यांदा या महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. त्या महिलेचे डीएनए घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले तर दुसरीकडे आसपासच्या परिसरात कोणी महिला बेपत्ता आहे का? याचा शोध सुरू होता. बीड जिल्ह्यातील होळ येथून एक महिला तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक उत्तम जाधव यांना समजले. त्यांनी तातडीने होळ गावी धाव घेऊन मयत महिलेचा मुलगा पंकज त्याची डीएनए चाचणी करून घेतली त्यातून ही महिला पंकजची आई उषा अर्जुन कसबे असल्याचे स्पष्ट झाले. कसून चौकशी केली असता मयत उषा यांचा खून हा तिचा मित्र अर्जुन कसबे जो तिच्यासोबत पतीप्रमाणे राहत होता त्यानेच केल्याचे स्पष्ट झाले.
न्यायालयात या प्रकरणाचे दोषारोपपत्र सादर केल्यानंतर १८ मे २०२२ रोजी यावर अंतिम सुनावणी झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्या.के.आर. पेठकर यांनी अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांचा युक्तिवाद आणि उपलब्ध साक्षी पुरावे ग्राह्य धरून आरोपी अर्जुन कसबे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या मध्ये पैरवी अधिकारी म्हणून सुधाकर सगर यांनी काम पाहिले.
दरम्यान, मृत महिला हि मूळची कर्नाटकातील बेळगाव येथील होती, कामानिमित्त ती इचलकरंजी येथे वास्तव्यास होती त्याच ठिकाणी कामास असलेल्या अर्जुन कसबे याच्याशी तिची ओळख झाली. या महिलेस पूर्वीच्या पतीपासून एक मुलगा होता त्यानंतर सुद्धा ते दोघे होळ या गावी वास्तव्यास आले अन् एका भाड्याच्या खोलीत संसार थाटला. आरोपी अर्जुन कसबे याचे ९ जून २०१६ रोजी एका मुलीशी लग्न झाले. त्यानंतर उषा आणि अर्जून मध्ये वाद सुरू होऊ लागले. शेवटी आठ दिवसातच अर्जुनने उषाचा काटा काढण्याचे ठरवले. १७ जून २०१६ रोजी आजारी असताना उषाला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने येरमाळा घाटात आणून डोक्यात दगड घालून खून केला.
COMMENTS