सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) डोंगरमाथ्यावर जलशोषक चर खोदून वाढदिवस साजरा करणाऱ्या रमेश खरमाळे यांच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेक...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
डोंगरमाथ्यावर जलशोषक चर खोदून वाढदिवस साजरा करणाऱ्या रमेश खरमाळे यांच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book of Records) नोंद घेण्यात आली आहे. हा बहुमान त्यांनी वन विभागाला समर्पित केला असल्याचे माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी सांगितले.
जुन्नर वनविभागातील वनरक्षक माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी श्री क्षेत्र धामणखेल (ता. जुन्नर) येथील खंडोबा मंदिराच्या डोंगरमाथ्यावर साठ दिवस श्रमदान करून ७० जलशोषक चर खोदून आपला ४५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला होता. या कामात त्यांना पत्नी स्वाती व मुलांची मोलाची साथ मिळाली. आपणावर असलेले निसर्गाने ऋण याच जन्मी फेडावे या हेतूने त्यांनी नोकरीच्या वेळा सांभाळून हा उपक्रम साठ दिवसात पूर्ण केला. दररोज पहाटे डोंगरमाथ्यावर चार तास श्रमदान करून नंतर कामावर कार्यालयात हजर व्हायचे हा त्यांचा दिनक्रम होता. या उपक्रमास १५ सप्टेंबर रोजी त्यांनी सुरुवात केली. या दिवशी वृक्षारोपण करण्यासाठी १६ खड्डे खोदले. दुसऱ्या दिवसापासून जलशोषक चर खोदण्यास सुरूवात केली.
दोन महिन्यात कोणत्याही प्रकारची अडचण न येता ६० व्या दिवशी जलशोषक चर खोदून वाढदिवसानिमित्त प्रत्येक दिवशी घामाची अंघोळ करूनच निसर्गाला भेट अर्पण केली.
खरमाळे यांनी ६० दिवसांत ३०० तास श्रमदान करून ७० जलशोषक चरांची निर्मिती केली. यात सुमारे ८ लाख लिटर पावसाचे पाणी साचेल. पावसाच्या पाण्याने चर भरल्यानंतर पाणी जमिनीत जिरून जमिनीत पाण्याच्या पातळीत आठ लाख लिटरने वाढ होईल. वर्षभरात २० पाऊस झाले तर वर्षाला एक कोटी ६० लाख लिटर पाणी जमिनीत जिरविण्याचा उद्देश सफल होणार असल्याचे खरमाळे यांनी सांगितले. खोदलेल्या चरांच्या ढिगाऱ्यावर कमीत कमी ५०० झाडे लावली तर परिसरात जंगल निर्माण होईल.
या रेकॉर्डसाठी मनीष पुराणिक व विनायक साळुंखे यांची मदत झाली. या कामात वन परीक्षेत्र अधिकारी अजित शिंदे व कर्मचारी, तसेच मित्र, माध्यमे यांचे त्यांनी आभार मानले.
:>निसर्गाचे जतन व जैवविविधतेला फायदा होईल अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याचा एक प्रयत्न केला व त्यांची दखल भारतीय रेकॉर्ड बुकने घेतली याचा खूप आनंद झाला आहे.......रमेश खरमाळे, माजी सैनिक
COMMENTS