कानपूर: उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील बांदामध्ये एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. गावातील तरुणाच्या त्रासाला कंटाळून तिनं गळफास घेतला....
कानपूर: उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील बांदामध्ये एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. गावातील तरुणाच्या त्रासाला कंटाळून तिनं गळफास घेतला. तिच्या मृतदेहाजवळ दोन पानांची सुसाईड नोट आढळून आली.
त्यामध्ये तरुणाच्या नावाचा उल्लेख आहे. तरुण सातत्यानं ब्लॅकमेल करत असल्यानं विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं.
सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत. अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. १९ वर्षांची रोशनी करबई गावची रहिवासी होती. ती बारावीत शिकत होती. रविवारी संध्याकाळी तिनं स्वत:ला खोलीत बंद करून घेतलं. त्यानंतर नायलॉनच्या दोरीनं गळफास लावून घेतला. काही वेळानं तिच्या लहान भावानं खोलीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. पण दरवाजा बंद होता. त्यानं कसाबसा दरवाजा उघडला. त्यावेळी रोशनी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली.
पोलिसांना रोशनीच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली. दोन पानांच्या नोटमध्ये गावातील एका तरुणाचा उल्लेख आहे. तरुण ब्लॅकमेल करायचा, त्रास द्यायचा, असं रोशनीनं नोटमध्ये म्हटलं आहे. नोटच्या शेवटी आईची काळजी घ्या असा संदेश तिनं लिहिला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
गावातला एक तरुण रोशनीला कॉलेजमधून येता जाता त्रास द्यायचा, अशी माहिती रोशनीच्या भावानं दिली. रोशनीला तीन बहिणी आहेत. रोशनी सर्वात लहान आहे. रोशनीनं आत्महत्या केली, त्यावेळी तिची आई नातेवाईकांकडे गेली होती. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
COMMENTS