जुन्नर: भिवाडे ते जुन्नर या मार्गावरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस फेऱ्यांच्या दुपारच्या वेळेतील ढिसाळ व्यवस्थापनामुळे ...
जुन्नर: भिवाडे ते जुन्नर या मार्गावरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस फेऱ्यांच्या दुपारच्या वेळेतील ढिसाळ व्यवस्थापनामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दुपारच्या सत्रात शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी तसेच परतण्यासाठी भिवाडे, बोतार्डे, आमलेवाडी, दत्तमंदिर, राळेगण, शिंदे, सोनावळे आणि इंगळून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध होत नाही. प्रशासनाकडून या मार्गावर अत्यंत जुन्या आणि मोडकळीस आलेल्या बसेस पाठवल्या जात असल्याने त्या वारंवार मध्येच बिघडून बंद पडत आहेत. यामुळे मुसळधार पावसात भर रस्त्यात गाड्या बंद पडल्याने विद्यार्थ्यांना तासनतास अडकून पडावे लागत आहे. नियोजित वेळेपेक्षा बस आधीच तास-तास उशिराने धावत असताना, त्यात गाडी बिघडण्याच्या प्रकारांमुळे कोसळणाऱ्या पावसात विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या पावसामुळे मुलांचे कपडे आणि शालेय साहित्याचे नुकसान होत असून, विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता येत नसल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दुपारच्या वेळी बसची संख्या अतिशय कमी असल्याने आणि उपलब्ध बसेसच्या दुरवस्थेमुळे बोतार्डे, इंगळून व सोनावळे परिसरातील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी जमते. एखादी बस आलीच, तर त्यात चढण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी झुंबड उडते, ज्यामुळे अनेकदा लहान मुलांना आणि विद्यार्थिनींना जागा मिळत नाही. हक्काचा पास असूनही एसटीच्या या अशा शाश्वत नसलेल्या कारभारामुळे आणि मोडकळीस आलेल्या गाड्यांमुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचा महागडा आणि असुरक्षित प्रवास करावा लागत आहे, जो ग्रामीण भागातील गरीब पालकांच्या आवाक्याबाहेर आहे. एसटी प्रशासनाच्या या मनमानी आणि निष्काळजी कारभारामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, या मार्गावर चांगल्या स्थितीतील बसेस सुरू कराव्यात आणि दुपारच्या सत्रातील वेळापत्रक त्वरित सुधारावे, अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.


COMMENTS