पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. बिहार-बंगाल सीमेवर असलेल्या हरिश्चंद्रपूर भागात द...
पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. बिहार-बंगाल सीमेवर असलेल्या हरिश्चंद्रपूर भागात दोन महिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली, तर तिची सुटका करण्यासाठी गेलेली दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. हरिश्चंद्रपूर ब्लॉक-२ मधील दौलतनगर गावातील दोन महिला सीमाभागातील बिहारमधील अहमदाबाद अंतर्गतातील गोविंदपूर येथे गवत कापण्यासाठी गेल्या होत्या.
कोयत्याने हल्ला अन् बलात्कार
तिथे एका अज्ञात इसमाने त्यांना घेरले आणि एका महिलेचे जबरदस्तीने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुसऱ्या महिलेने प्रसंगावधान राखून तिला वाचवण्यासाठी मध्यस्थी केली असता, आरोपीने तिच्यावर कोयत्याने थेट हल्ला केला. या हल्ल्यात दुसरी महिला गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपीने पहिल्या महिलेला बळजबरीने उंच गवताच्या झाडीत ओढत नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून कोयत्याने गळा चिरून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
संतप्त गावकऱ्यांची निदर्शने
या भीषण हल्ल्यातून गंभीर जखमी झालेली महिला कशीबशी जीव वाचवून गावात पोहोचली आणि तिने गावकऱ्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडीतून पीडितेचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी राज्य महामार्ग रोखून धरला आणि रस्त्यावर टायर जाळून निदर्शने केली. घटनेची माहिती मिळताच हरिश्चंद्रपूर (पश्चिम बंगाल) आणि अहमदाबाद (बिहार) या दोन्ही पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
श्वासनलिका कापून संपवलं
हरिश्चंद्रपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, तिची श्वासनलिका कापून हत्या करण्यात आल्याचे आणि शरीरावर अनेक जखमा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचे धागेदोर बिहारशी जोडलेले असू शकत असल्याने बिहारच्या अहमदाबाद पोलिसांशी सतत संपर्क साधला जात आहे. दरम्यान, अत्याचाराच्या घटनेला अधिकृत पुष्टी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मिळेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.


COMMENTS