पुण्यातील कोंढवा भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला 'शरीरावर नकारात्मक ऊर्जा' (नेगेटिव्ह एनर्जी) असल्याचे सांगून ती...
पुण्यातील कोंढवा भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला 'शरीरावर नकारात्मक ऊर्जा' (नेगेटिव्ह एनर्जी) असल्याचे सांगून ती दूर करण्याच्या बहाण्याने अश्लील छायाचित्रे मागणाऱ्या तथाकथित आध्यात्मिक इन्फ्लुएन्सरला पोलिसांनी अटक केली आहे.
दिव्य जितेंद्र परमार (वय 23, रा. पार्श्वनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक असल्याचं सांगत असे आणि मानसिक शांती व सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करत असे. तक्रारदार तरुणीदेखील त्याच्या अशाच एका सत्रात सहभागी झाली होती, जिथून त्यांच्यात वैयक्तिक संवाद सुरू झाला.
'विवस्त्र छायाचित्रे पाठव...'
संवादादरम्यान आरोपीने तरुणीच्या शरीरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असल्याचे सांगून तिच्या मनात भीती निर्माण केली. ही ऊर्जा दूर करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची 'शारीरिक हालचाल' (फिजिकल अॅक्टिव्हिटी) करावी लागेल, असा दावा त्याने केला. या प्रक्रियेचाच एक भाग असल्याचे भासवून त्याने तरुणीला तिच्या मोबाईल फोनवरून विवस्त्र छायाचित्रे पाठवण्यास सांगितले. आरोपीच्या बोलण्याला बळी पडून आणि प्रचंड दबावाखाली येऊन तरुणीने स्वतःची अश्लील छायाचित्रे त्याच्या मोबाईलवर पाठवली.
आरोपी कोण आहे?
आपली फसवणूक झाल्याचे आणि गैरफायदा घेतला गेल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी दिव्य जितेंद्र परमार याला अटक केली. आरोपीवर महिलेच्या विनयभंगासह महाराष्ट्र जादुटोणा विरोधी कायद्यातील (नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबतचा कायदा) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला पोलीस कोठडी
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तांत्रिक तपासणी केली जात असून, आरोपीने तरुणीशी कसा संपर्क साधला आणि या प्रकरणात आणखी काही डिजिटल पुरावे किंवा इतर पीडित व्यक्ती आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून कोंढवा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


COMMENTS