नाशिक: चहाच्या व्यवसायात 'बरकत' यावी म्हणून संपर्कात आलेल्या संशयित भोंदूबाबाने पीडित महिलेलाच जादूटोणा करून मारण्याची धमकी देत लग...
नाशिक: चहाच्या व्यवसायात 'बरकत' यावी म्हणून संपर्कात आलेल्या संशयित भोंदूबाबाने पीडित महिलेलाच जादूटोणा करून मारण्याची धमकी देत लग्न करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेने त्याला घरात जादूटोण्याचा दरबार भरविण्यास विरोध केला असता संशयित भोंदूबाबाने मारहाण केली.या प्रकरणी अखेर पीडितेने सायखेडा पोलिसांत धाव घेत तक्रार दिली असून, संशयित भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवन भानुदास गोहाड (रा. दारणासांगवी, ता. निफाड, जि. नाशिक) असे संशयित भोंदूबाबाचे नाव आहे. ४३ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीनुसार, कुटुंबीयांच्या संमतीने विवाह झालेल्या पतीपासून कौटुंबिक कारणातून त्या वेगळ्या राहतात. तर, २०२२ पासून त्या नाशिक शहरातील एका बसआगारासमोर चहाची टपरी चालवितात; परंतु पाहिजे तसा व्यवसाय होत नसल्याने त्या चिंतीत होत्या.
मैत्रिणीने त्यांना चितेगाव फाट्यावरील बाबाकडे जाण्यास सांगितले असता, त्यांनी ओळखीतील नवनाथ गोहाडकडे विचारणा केली. त्यांनी त्यापेक्षा संशयित यवन गोहाड चांगला उपाय देतील, असे सांगितले. त्यानंतर संशयित भोंदू गोहाड पीडितेच्या घरी आला. त्याने तांदूळ मंत्रून चहाच्या टपरीत फेकायला सांगितले. त्यासाठी तीन हजार रुपये त्याने घेतले. त्यानंतर तो सतत फोन करून पीडितेशी संपर्कात होता.दरम्यान, संशयिताने पीडितेचा विश्वास संपादन केल्यावर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. महावितरण कंपनीत कंत्राटी नोकरीला असल्याचे सांगत त्याने पीडितेला लग्नाची मागणी घातली. लग्न न केल्यास जादूटोणा करून संपवून टाकण्याची भीती दाखविली. त्यामुळे घाबरून पीडितेने संशयित भोंदूबाबाशी ६ सप्टेंबर २०२३ ला घारपुरे घाटावरील श्री साई वैदिक विवाह संस्था येथे वैदिक पद्धतीने विवाह केला.
त्यानंतर तो पीडितेबरोबर मखमलाबाद येथे राहू लागला. लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तो जादूटोण्याच्या बहाण्याने घरातच दरबार भरवू लागला. त्यास विरोध केला असता पीडितेला मारहाण केली. त्यामुळे लहान मुलासह पीडिता संशयिताच्या दारणासांगवी गावी राहण्यास गेली. तिथेही त्यानेच तोच उद्योग सुरू केला. गुरुवारी (ता. २) रात्री पुन्हा त्याने मारहाण केल्याने जीवाच्या भीतीने पीडिता घराबाहेर पडली. डायल ११२ वर संपर्क साधल्याने सायखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


COMMENTS