राजस्थानमधील अलवर शहरात एकट्या राहणाऱ्या दिनेशचंद्र अग्रवाल (वय 70) या वृद्ध व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी लूटमार ...
राजस्थानमधील अलवर शहरात एकट्या राहणाऱ्या दिनेशचंद्र अग्रवाल (वय 70) या वृद्ध व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी लूटमार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत पर्दाफाश केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असून, दोन अल्पवयीन मुलांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेतील एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. घराचा गृहकर्जाचा हप्ता (ईएमआय) भरण्यासाठी पैशांची अत्यंत गरज असल्याने मुख्य आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
'अशी' झाली हत्या
मृत दिनेशचंद्र अग्रवाल हे जुनी नाणी आणि नोटांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायचे आणि घरात एकटेच राहायचे, याची आरोपींना पूर्ण कल्पना होती. याच माहितीच्या आधारे पाच जणांच्या टोळीने गुरुवारी (9 जुलै) रात्री त्यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा कट रचला. आरोपी घराच्या मागच्या बाजूने आत शिरले, तेव्हा दिनेशचंद्र गाढ झोपेत होते. आरोपींचा उद्देश केवळ चोरी करण्याचा होता, मात्र चोरी करत असतानाच वृद्ध दिनेशचंद्र यांना जाग आली. यामुळे घाबरलेल्या आरोपींनी त्यांचे हात-पैर बांधले आणि तोंडात कपडा कोंडला. तोंड आणि नाक दाबले गेल्यामुळे गुदमरून दिनेशचंद्र यांचा जागीच मृत्यू झाला, त्यानंतर आरोपी कपाटातील रोकड आणि नाणी घेऊन पसार झाले.
12 तास आरोपी जेरबंद
दिनेशचंद्र हे रोज रात्री आपल्या मुलाच्या घरी जेवणासाठी जायचे. गुरुवारी रात्री ते जेवायला न आल्याने आणि त्यांचा फोनही लागत नसल्याने मुलगा विकास अग्रवाल वडिलांच्या जुन्या घरी पोहोचला. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, वडिलांचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी 12 तासांत शोध मोहीम राबवून करण रामजीलाल आणि तेजू ऊर्फ तेजपाल (दोघे रा. अलवर, वय 20 वर्ष) या दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले.
प्रत्येकाच्या वाट्याला केवळ 4 ते 5 हजार
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या हाती मोठी रक्कम लागली नसून प्रत्येकाच्या वाट्याला केवळ चार ते पाच हजार रुपये आले होते. तसेच त्यांनी चोरी केलेली सुमारे 1800 ते 2000 रुपयांची जुनी नाणी बाजारात चालवली असून पोलीस आता ती नाणी हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हे त्याच परिसरातील रहिवासी असून मृत वृद्धाला 'अंकल' म्हणून हाक मारायचे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला 'केस ऑफिसर स्कीम' अंतर्गत चालवला जाणार आहे. तसेच अलवर शहरात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस लवकरच विशेष मोहीम राबवणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


COMMENTS