सध्याच्या धावपळीच्या काळात हॉर्ट अॅटॅक आणि यासारखे गंभीर आजार हे टेन्शनमुळे वाढत आहेत. अगदी १० आणि १२ वर्षांच्या मुलालाही सहज हॉर्ट अॅटॅक ...
सध्याच्या धावपळीच्या काळात हॉर्ट अॅटॅक आणि यासारखे गंभीर आजार हे टेन्शनमुळे वाढत आहेत. अगदी १० आणि १२ वर्षांच्या मुलालाही सहज हॉर्ट अॅटॅक येत आहे. अशावेळी त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार झाले नाहीत तर माणूस दगावण्याचा धोका असतो. CPR म्हणजेच कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन हे कोणाचाही जीव वाचवण्यासाठीचे एक प्रभावी माध्यम मानले जाते. सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओ पाहून लोक संकटकाळात मदत करायला धावून जातात. पण, अर्धवट ज्ञान किती महागात पडू शकते, याचे एक धक्कादायक उदाहरण मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातून समोर आले आहे.
बेशुद्ध पडलेल्या एका महिला शिक्षिकेला हार्ट अटॅक आलाय, या गैरसमजातून काही तरुणांनी तिला सतत सीपीआर दिला. पण रुग्णालयात गेल्यानंतर समोर आले की, महिलेला हार्ट अटॅक आलाच नव्हता, उलट अति आणि चुकीच्या पद्धतीने CPR दिल्यामुळे तिच्या दोन बरगड्या मात्र तुटल्या होत्या. यामुळे खळबळ उडाली आहे. कुणालाही सीपीआर सारखी ट्रिटमेंट देत असाल किंवा कोणी देत असेल आणि तुम्ही तिथे असाल तर कोणत्या गोष्ट लक्षात ठेवायला हव्यात ते आज तुम्हाला सांगणार आहे.
मुरैना जिल्ह्यातील कैलारस परिसरात राहणाऱ्या ४१ वर्षीय ललिता धाकड या शाळेत शिक्षिका आहेत. बुधवारी कडक उन्हामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या चालत्या स्कूटरवरून रस्त्यावर पडल्या. तिथून जाणाऱ्या दोन तरुणांनी ललिता यांना बेशुद्ध अवस्थेत पाहिले. आजकाल हार्ट अटॅकचे प्रमाण वाढल्याने, त्या तरुणांनी तातडीने मदत करण्याच्या भावनेने ललिता यांना तिथेच रस्त्यावर सीपीआर देण्यास सुरुवात केली.
एवढ्यावरच न थांबता, तिला गाडीत टाकून रुग्णालयात नेतानाही ते तरुण वाटेत सतत CPR देत राहिले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितले की, ललिता यांना हार्ट अटॅक आलेला नव्हता, तर उन्हाच्या त्रासामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या. उपचारानंतर त्या शुद्धीवर आल्या, पण त्यांच्या छातीत असह्य वेदना होत होत्या. एक्स-रे केला असता, चुकीच्या आणि जास्त वेळ दिलेल्या सीपीआरमुळे त्यांच्या दोन बरगड्या तुटल्याचं समोर आलं.
सीपीआर नक्की कधी द्यावा?
प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉ. टी. एस. क्लेर यांनी एक वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा योग्य पद्धतीने सीपीआर देतानाही फासळ्या तुटण्याचा धोका असतो, पण जर तंत्र चुकीचे असेल तर हा धोका दुप्पट होतो. जर व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध असेल आणि तिचे श्वास चालत नसतील. व्यक्तीची पल्स लागत नसेल आणि तिला कार्डियाक अरेस्ट आल्याची दाट शक्यता असेल.
या परिस्थितीत सीपीआर देऊ नका
व्यक्तीला केवळ नेहमीसारखी चक्कर आली असल्यास. व्यक्ती बेशुद्ध असली तरी तिचे श्वास व्यवस्थित सुरू असल्यास. उन्हामुळे हीट स्ट्रोक, अशक्तपणामुळे किंवा लो बीपीमुळे Low BP चक्कर आली असल्यास. अनेकदा आपल्या सर्वात गल्लत यामध्येच होते. हार्ट अटॅक म्हणजे हृदयाकडे जाणाऱ्या रक्ताचा प्रवाह थांबणे. यात व्यक्ती शुद्धीवर असू शकते आणि तिचे श्वास सुरू असतात. प्रत्येक हार्ट अटॅकमध्ये सीपीआरची गरज नसते. कार्डियाक अरेस्ट म्हणजे अचानक हृदयाचे धडधडणेच बंद होणे. यात व्यक्ती लगेच बेशुद्ध होते आणि श्वास घेणे बंद करते. फक्त अशाच वेळी सीपीआर देणे अनिवार्य असते.


COMMENTS