सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शेतकऱ्यांना घरी राहण्याचं आवाहन "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी बैठक घेतली. मुख्यम...
सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शेतकऱ्यांना घरी राहण्याचं आवाहन
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सर्व गोष्टींचं नियोजन केलं जात आहे. नाशिक महापालिका आयुक्त आणि महापौर शहर भागातील पूर परिस्थितीवर नियोजन करणार आहे. तर ग्रामीण भागात नाशिक तालुका, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुका या भागातील सर्व शाळा, कॉलेज उद्या बंद राहणार आहे. उद्या मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी शेतात जाणं टाळावं. अतिआवश्यक नसेल तर प्रवास करणं टाळावं", असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
काही रस्ते बंद राहणार
"ज्या भागांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे ते रस्ते बंद केले जाणार आहेत. त्याची यादी PWD, राष्ट्रीय महामार्ग आणि पोलीस विभाग यांच्याकडून जारी केली जाईल. शेतकऱ्यांना विनंती आहे की, कारण नसताना घराबाहेर पडू नये", असं आवाहनदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.त्र्यंबकेश्वर आणि सप्तश्रृंगी देवस्थान बंद राहणार
"उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थान बंद ठेवण्यात येणार आहे. आज संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर शेवटची पूजा राहणार आहे.त्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान परवापर्यंत बंद राहणार आहे. भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वरला येणं टाळावं. तसेच सप्तश्रृंगी मंदिराच्या परिसरात 65 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सप्तरश्रृंगी देवस्थान उद्या बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत", अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
"ज्या ठिकाणी पुराचे पाणी येण्याची शक्यता आहे त्या गावांची यादी तयार करण्यात आली. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाण्याचा प्रवाहाला जाण्यास कोणता अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत", अशीदेखील माहिती त्यांनी दिली.


COMMENTS