सिंधु जल कराराच्या स्थगितीवरून पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक यांनी चिथावणीखोर वक्तव्य नुकतंच केलं होतं. त्यानंतर मंत्री इशाक दार यांनीही...
सिंधु जल कराराच्या स्थगितीवरून पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक यांनी चिथावणीखोर वक्तव्य नुकतंच केलं होतं. त्यानंतर मंत्री इशाक दार यांनीही अशाच प्रकारचं वक्तव्य करत भारताला अप्रत्यक्ष इशारा दिला.त्यानंतर आता पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार बिलावल भुट्टो यांनी देखील सिंधू जल कराराच्या स्थगितीवरून चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे.’पाकिस्तानला शांतता हवी, शरणागती नाही’, असं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं आहे.
बिलावल भुट्टो काय म्हणाले?
“जर कोणाला वाटत असेल की पाकिस्तान सिंधू नदीचं पाणी सोडून देईल, तर ते कदाचित पाकिस्तानला चांगलं ओळखत नसतील. आम्हाला शांतता हवी आहे, पण सन्मानपूर्ण. आम्हाला संवाद हवा आहे, पण तो कायद्याच्या चौकटीत राहून. आम्हाला शांतता हवी आहे, शरणागती नाही. या माध्यमातून एक संदेश गेला पाहिजे की, पाकिस्तान आपल्या जलसंपत्तीचं, जनतेचं, करारांचं, आपल्या सार्वभौमत्वाचं आणि आपल्या भविष्याचं रक्षण करेल”, असं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं आहे.
“पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करणं हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे. पाकिस्तान आपल्या जनतेच्या मूलभूत अधिकारांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही हे पाकिस्ताननेही स्पष्टपणे बोललं पाहिजे. सिंधू नदी हे दबावाचं ठिकाण नाही किंवा सौदा करण्याची वस्तू नाही. तसेच सिंधू नदी हे भारताच्या हातातील शस्त्र देखील नाहीये”, असं वक्तव्य बिलावल भुट्टो यांनी केलं. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
व्हेनेझुएलात मृत्यू झालेल्या राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं; मृतदेहातून हृदय आणि मेंदूसह महत्त्वाचे अवयव गायब! राकेशसोबत काय घडलं?
"जे पाणी अडवतील, त्यांचे हात तोडू" : मंत्री मलिक
पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना सिंधू जल कराराचा उल्लेख करत भारताला अप्रत्यक्ष पोकळ धमकी दिली आहे. "सिंधू पाणी करारांतर्गत पाकिस्तानच्या वाट्यावर दावा सांगणाऱ्यांचे हात कापून टाकले जातील. पाकिस्तानच्या पाणी हक्कांवर गदा आल्यास गंभीर परिणाम होतील. पाण्याचा नळ शेजारील देशाच्या पंतप्रधानांच्या हातात आहे, ते म्हणतात की, ते पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात वाहू देणार नाही. मात्र, पाकिस्तानसाठी निश्चित केलेल्या पाण्याच्या प्रवाहात कोणालाही अडथळा आणू दिला जाणार नाही", असं वक्तव्य मुसादिक मलिक यांनी केलं.
इशाक दार यांनी काय वक्तव्य केलं?
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरचा ऐतिहासिक सिंधू जल करार स्थगित केला. यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली. पाकिस्तानची शेती आणि वीज निर्मिती ही पूर्णपणे सिंधू नदी प्रणालीवर अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी, "हा करार म्हणजे केवळ पाण्याचं वाटप नाही, तर प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि सहकार्याचं एक महत्त्वाचं साधन आहे", असं वक्तव्य केलं.
इशाक दार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं की, "पाण्याचा वापर शस्त्र म्हणून केला जाऊ नये. पाकिस्तानला हक्कापासून वंचित ठेवल्यास दक्षिण आशियातील २०० कोटी लोकांच्या शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण होईल", असा इशारा त्यांनी दिला.


COMMENTS