भारतात वर्क लाईफ बॅलन्सवरुन नेहमीच वादविवाद होत असतात. एकीकडे कामाचे तास वाढवण्याचे समर्थन होते, तर दुसरीकडे कामाचे तास कमी करण्याबाबत बोल...
भारतात वर्क लाईफ बॅलन्सवरुन नेहमीच वादविवाद होत असतात. एकीकडे कामाचे तास वाढवण्याचे समर्थन होते, तर दुसरीकडे कामाचे तास कमी करण्याबाबत बोलले जाते.अशातच, एका भारतीय ‘स्टार्टअप’ कंपनीच्या अरेरावीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवसभर काम करून थकल्यामुळे रात्री उशिरा आलेला फोन न उचलल्याने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट कर्मचाऱ्याच्या आईला फोनवर ‘व्यावसायिकतेचे’ धडे देत सुनावल्याचा आरोप एका कर्मचाऱ्याने केला आहे. या कर्मचाऱ्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेडिट’वर मांडलेली आपली व्यथा सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
एका स्टार्टअपमध्ये काही महिन्यापूर्वीच भरती झालेल्या तरुणाने लिहिलंय, की एका महत्त्वाच्या प्रोजक्टची डेडलाईनसाठी आम्ही दिवसभर ऑफिसमध्ये काम करत होतो. घरी आल्यानंतरही रात्री २ वाजेपर्यंत सर्वांनी कामावर राहण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे काम सुरू होते. पण, ऑफिसमध्ये दिवसभर काम करुन थकल्यामुळे मध्यरात्री माझा डोळा लागला. रात्री उशिरा कंपनीच्या व्यवस्थापनाकडून व्हॉट्सॲपवर ग्रुप कॉल करण्यात आला. पण, मला झोप लागल्याने मी उचलला नाही. मात्र, माझ्या मोबाईलची रिंग मोठमोठ्याने वाजतच होती. तरुणाची रेडिट पोस्ट
आईलाच फोनवर झापले..
सारखा फोन वाजत असल्याने आईने फोन उचलला. त्यावेळी तो कर्मचारी कुठे आहे? हे विचारायचं सोडून ते आईवरच ओरडले. फोन करणाऱ्यांनी त्याच्या आईसमोरच त्याच्या व्यावसायिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हा फुल-टाईम रोल आहे, तुमचा मुलगा असा कसा झोपू शकतो? त्याला कामाचे गांभीर्य नाही, असे माझ्या आईला सुनावण्यात आले,” असे पीडित कर्मचाऱ्याने लिहिले. काम महत्त्वाचे होते, हे मान्य आहे. पण, यात माझ्या आईला बोलण्याचा काय अधिकार होता?
केवळ २३,००० रुपये पगार आणि एवढी पिळवणूक?
या पोस्टमध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एवढ्या तणावाखाली काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याचा महिना पगार अवघा २३,००० रुपये आहे. इतक्या कमी पगारात रात्री २ वाजेपर्यंत काम करण्याची सक्ती आणि त्यानंतर कुटुंबाचा होणारा अपमान यामुळे तो कर्मचारी प्रचंड अस्वस्थ झाला असून, त्याने ‘मी नोकरी सोडू का?’ असा प्रश्न नेटीझन्सना विचारला आहे.सोशल मीडियावर नेटीझन्सचा भडका
या पोस्टवर नेटकरी तुटून पडले असून अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले आहेत. एकजण म्हणाला, “नाही मित्रा, तू चुकत नाहीस, ती कंपनीच पूर्णपणे अव्यावसायिक आहे. अधिकृत संवादासाठी ‘टीम्स’ किंवा ईमेलचा वापर व्हायला हवा, व्हॉट्सॲपवर रात्री २ वाजता फोन करणे चुकीचे आहे. तू त्वरित नोकरी सोड आणि दुसरीकडे शोध.” दुसरा म्हणाला, “माझ्याकडे काम करणाऱ्या मजुरांना तुझ्यापेक्षा जास्त मजुरी मिळते, शिवाय त्यांना दुपारचे जेवण, चहा आणि १ तासाचा ब्रेक मिळतो. तुझी निव्वळ पिळवणूक सुरू आहे.” तिसरी कमेंट आहे, “भारतीय कंपन्यांमध्ये टिकून राहायचे असेल तर कातडी जाड करावी लागते, कारण येथील कार्यसंस्कृती अत्यंत खराब आहे. तुला पगार महत्त्वाचा आहे की वर्क-लाईफ बॅलन्स, हे ठरव आणि त्यानुसार पुढील नियोजन कर.”



COMMENTS