कुमशेत (ता. जुन्नर) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमशेत येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून बाल दिंडी पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर...
कुमशेत (ता. जुन्नर) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमशेत येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून बाल दिंडी पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमात इयत्ता पहिली ते चौथीतील सर्व विद्यार्थी तसेच अंगणवाडीतील बालकांनी वारकरी बनून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमशेत येथून पालखी प्रस्थानाने झाली. पारंपरिक वारकरी वेशभूषा, कपाळावर गंध-टिळा, हातात टाळ-मृदुंग, भगवे झेंडे आणि **"ज्ञानोबा-तुकाराम"**च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. विद्यार्थ्यांनी भजने, अभंग, ओव्या, गवळणी सादर केल्या. तसेच झिम्मा, फुगडी यांसारखे पारंपरिक खेळ खेळत वारकरी परंपरेचा आनंद अनुभवला.
यावेळी शौर्य आशिष डोके व साई हनुमान वाणी यांनी विठ्ठलाचा देखणा पोशाख साकारला. सह्याद्री डोके, ज्ञानेश्वरी डोके व प्राची डोके यांनी रुक्मिणीचा पारंपरिक पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देवांश डोके, रुद्र डोके, आरूष डोके, शंतनू डोके व अथर्व डोके यांनी आकर्षक पालखी सजवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
दिंडी गावातील हनुमान मंदिरात पोहोचल्यानंतर तेथील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी रांगेत दर्शन घेतले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी सुमधुर अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी सौ. स्वाती लक्ष्मण डोके यांनी सर्व बाल वारकऱ्यांना चिक्कीचा खाऊ भेट देऊन उपक्रमास मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, महिला पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशितोष डोके, सदस्य संदीप डोके व रेणुका डोके, तसेच समितीचे इतर सदस्य, ग्रामस्थ, युवक मंडळ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पदमा ताई शिंदे, पांडुरंग डोके, विनायक डोके, महेश डोके, स्वाती डोके, आशिष डोके, गणेश डोके, मयुर डोके, पूजा वाणी, तसेच अंगणवाडी सेविका प्रियंका डोके, वैशाली डोके, हर्षदा डोके आणि इनामदार भाभी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी श्याम सर यांनी संत परंपरेचे महत्त्व व वारकरी संप्रदायाची महान परंपरा याविषयी मार्गदर्शन केले. यशवंत घोडे सर यांनी बाल दिंडी उपक्रमाचे शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करून उपस्थित ग्रामस्थ, पालक आणि सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संतांचे विचार, भक्ती, संस्कार, सामूहिकता आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भारावून गेले असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेतचा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.




COMMENTS