पाटणा : पतीच्या हत्येमुळे पत्नी अत्यंत शोकाकुल अवस्थेत ऊर बडवत होती. ज्याने माझ्या नवऱ्याचा खून केला, त्याला माझ्या समोर आणा, जिवाच्या बदल्...
पाटणा : पतीच्या हत्येमुळे पत्नी अत्यंत शोकाकुल अवस्थेत ऊर बडवत होती. ज्याने माझ्या नवऱ्याचा खून केला, त्याला माझ्या समोर आणा, जिवाच्या बदल्यात जीव घेईन, असे पत्नी तावातावाने बोलत होती.वरकरणी कोणालाही सहानुभूती वाटली असती, मात्र घराच्या चार भिंतींआड दडलेलं एक गुपित बाहेर आलं आणि संपूर्ण परिसराला हादरवून सोडलं. बिहारमधील किशनगंज येथे हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. घरी येणाऱ्या प्रत्येकासमोर पत्नी अश्रू ढाळत सांगत होती की, चोरट्यांनी घरात घुसून तिच्या पतीची हत्या केली व ते पळून गेले. मात्र, पोलिसांच्या तपासादरम्यान अवघ्या ३६ तासांत एक सत्य समोर आले. प्रियकराच्या साथीने पत्नीनेच पतीचा काटा काढल्याचा उलगडा झाला.
रात्रीची वेळ होती. किशनगंज जिल्ह्यातील बिशनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४२ वर्षीय रिझवान आलम यांची बॉडी त्यांच्याच घरात आढळून आली होती. त्यांच्या डोक्यावर लोखंडी सळईने प्रहार केल्याच्या अनेक खुणा होत्या. बॉडी सापडल्यानंतर त्यांचे वडील नझीर आलम यांनी बिशनपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस अधीक्षक संतोष कुमार यांच्या आदेशानुसार एसडीपीओ खुसरु सिराज यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.
घरात वस्तू अस्ताव्यस्त
या तपासात न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि जिल्हा गुप्तचर विभागाचाही सहभाग होता. सुरुवातीला, चोरीच्या उद्देशाने केलेल्या हत्या झाल्याचा बनाव रचण्यात आला होता; खोलीतील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या आणि मोबाईल फोनही गायब होते. मात्र तपासदरम्यान पोलिसांना अशा काही गोष्टी आढळल्या ज्या चोरीच्या सिद्धांताशी विसंगत होत्या. पोलिसांचा संशय प्रामुख्याने मयताची ३३ वर्षीय पत्नी डेझी परवीन हिच्या जबाबांवर बळावला, कारण चौकशीदरम्यान ती वारंवार आपली विधाने बदलत होती. हीच विसंगती पुढे संपूर्ण प्रकरण उलगडण्यात निर्णायक दुवा ठरली.गावातील तरुणाच्या संपर्कात
जेव्हा पोलिसांनी डेझी परवीनचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरु केली, तेव्हा या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण लागले. घटनेच्या आधी आणि नंतरही ती गावातीलच रहिवासी असलेल्या २४ वर्षीय अन्वर हुसेनच्या सतत संपर्कात होती. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आणि त्यांची स्वतंत्रपणे चौकशी केली. चौकशीदरम्यान असे उघड झाले की, डेझी परवीन आणि अन्वर हुसेन यांच्यात गेल्या नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, अन्वर हा रिझवान आलमच्या घरात भाड्याने राहायचा; तिथेच दोघांची भेट झाली आणि त्यांची ओळख हळूहळू प्रेमात बदलली. अन्वर नंतर कामासाठी दुसरीकडे गेला, तरीही ते दोघे फोनवर सतत संपर्कात होते. याच काळात रिझवानला त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल समजले आणि त्याने विरोध करण्यास सुरुवात केली.
पती १३ वर्ष कुवेतला
डेझीशी लग्न झाल्यानंतर अवघ्या १३ दिवसांनी रिझवान नोकरीसाठी कुवेतला गेला होता आणि सुमारे १३ वर्षांनंतर परतला होता. या काळात पती-पत्नीमधील दुरावा वाढला, तर दुसरीकडे डेझी आणि अन्वर यांच्यातील जवळीक अधिक घट्ट झाली. सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत विविध दावे केले जात असले, तरी पोलिसांनी अधिकृतपणे प्रेमसंबंध आणि त्याला पतीचा असलेला विरोध हेच या हत्येचे मुख्य कारण असल्याचे सांगितले आहे.
त्या दोघांनी रिझवानचा काटा काढण्याचा कट रचला. घटनेच्या रात्री डेझीने मुद्दाम घराचा दरवाजा उघडा ठेवला आणि तिच्याकडील एका वेगळ्या मोबाईलवरुन अन्वरला बोलावले. त्यावेळी रिझवान गाढ झोपेत होता. खोलीत प्रवेश करताच अन्वरने रिझवानच्या डोक्यावर लोखंडी सळईने वारंवार प्रहार केले. हा हल्ला इतका भीषण होता की रिझवानचा जागीच मृत्यू झाला.
पुरावे मिटवण्याचा प्रयत्न
हत्येनंतर, त्या दोघांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. चोरीच्या उद्देशाने केलेल्या हत्येचा भास व्हावा, यासाठी त्यांनी खोलीतील वस्तू अस्ताव्यस्त पसरल्या. त्यानंतर त्यांनी रिझवान आणि डेझी या दोघांचेही मोबाईल सोबत घेतले; वाटेत त्यांनी ते दोन्ही फोन बंद केले आणि गावात वेगवेगळ्या ठिकाणी पुरून टाकले.
दरम्यान, पोलिसांना कोणताही सुगावा लागू नये म्हणून हत्येसाठी वापरलेली लोखंडी सळई नदीत फेकून देण्यात आली. मात्र मोबाईल कॉल तपशील, लोकेशन डेटा, तांत्रिक पुरावे आणि फॉरेन्सिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी घटनेचा संपूर्ण घटनाक्रम जुळवला. पुन्हा चौकशी केली असता, दोन्ही आरोपींनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुराव्यांच्या भक्कम माऱ्यापुढे ते फार काळ टिकू शकले नाहीत. अखेरीस, त्या दोघांनीही संपूर्ण कट आणि हत्या केल्याची कबुली दिली.


COMMENTS