मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत एसआयआर प्रक्रियेपासून ते राज्यातील आणि देशातील राज...
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत एसआयआर प्रक्रियेपासून ते राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत भाजपवर जोरदार टीका केली.सध्या देशात आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणाला त्यांनी 'घाणेरडं' असे संबोधत, त्याचे परिणाम भविष्यात भाजपलाही भोगावे लागतील, असा इशारा दिला.
एसआयआर प्रक्रियेचा उल्लेख करताना राज ठाकरे म्हणाले की, या प्रक्रियेचा फटका सर्वांनाच बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक मतदारांची नावे वगळली गेली असून, माजी मुख्यमंत्र्यांनाही त्याचा परिणाम सहन करावा लागला. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत त्यांनी देशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर नाराजी व्यक्त केली.
फोडाफोडीच्या राजकारणावर टीका
महाराष्ट्रात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. भविष्यात कोणता पायंडा पाडला जात आहे, याचा सर्व राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेत असताना अशा प्रकारचे राजकारण करणाऱ्यांनाही सत्ता गेल्यानंतर त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे राजकारणालाही काही मर्यादा असायला हव्यात, असे ते म्हणाले.
भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष वाढेल
जगाच्या इतिहासाचा दाखला देत राज ठाकरे म्हणाले की, ज्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यातच पुढे नवीन विरोधक निर्माण झाले आणि त्यांनीच त्यांना संपवले. हीच प्रक्रिया आता भाजपमध्ये सुरू झाली असून, भविष्यात पक्षाला अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागेल, असा दावा त्यांनी केला.
'विकले जाणाऱ्यांचाही विचार करा'
पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी, "प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला तयार असतील तर ग्राहक असणारच," अशा शब्दांत टीका केली. अशा प्रकारचे राजकारण घाणेरडे असून, त्याविषयी जनतेतही संताप असल्याचे त्यांनी म्हटले.
अमित शाहांवरही निशाणा
राज ठाकरे यांनी भाजपचे संपूर्ण राजकारण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर उभे असल्याचे सांगितले. "हा पत्त्यांचा बंगला आहे आणि त्याचा खालचा पत्ता नरेंद्र मोदी आहेत. तो एकदा सरकला तर संपूर्ण रचना कोसळेल," असे ते म्हणाले. सध्या सुरू असलेले हे राजकारण भाजपच्या अंगलट येईल आणि या राजकीय रणनीतीमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसमधील खासदारांच्या फुटीचा उल्लेख करत त्यांनी, फुटलेले खासदार थेट भाजपमध्ये का गेले नाहीत किंवा स्वतंत्र गट का तयार करण्यात आला, असा सवाल उपस्थित केला. भविष्यात पंतप्रधानपदासाठी दावा करण्याच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हे घडत असल्याचा दावा करत, बेधुंद सत्ता आल्यावर अशा प्रकारचे राजकारण घडत असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले.


COMMENTS