पुण्याच्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. सिया गोयल ही स...
पुण्याच्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. सिया गोयल ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे ती चर्चेत आली.
तिचं पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल याच्याशी लग्न ठरलं होतं. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण सियाचं चेतन चौधरी या तरुणासोबत प्रेम प्रकरण होतं. सिया आणि चेतन या दोघांनी केतनला लोहगड किल्ल्यावरुन ढकलून देत त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांना आता मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात मोहीम राबवली जात आहे. या मोहीमच्या माध्यमातून दुषित अन्नपदार्थ आणि खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर छापा टाकला. यावेळी आठ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीस
सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात मसाल्याचं दुकान आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने या दुकानात धाड टाकली. यावेळी तपासणी केल्यानंतर हळद पावडर, तीळ, सोयाबीनचे नमुने जप्त करण्यात आले आहेत. 8 लाख रुपयांचा 4 हजार किलोंचा साठा जप्त करण्यात आला आहे. लेबलमधील त्रुटी, भेसळीच्या संशयावरुन हा साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित दुकानाने आवश्यत नियम आणि तरतुदींचे पालन न केल्याने पुढील आदेशापर्यंत थेट व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
निकृष्ठ दर्जाचा ठपका
सिया गोयलच्या वडिलांचे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात बी. जी. गोयल अॅण्ड कंपनी नावाचे दुकान आहे. या दुकानावर एफडीएने मंगळवारी अचानक धाड टाकली आणि तपासणी केली. यावेळी दुकानातील माल निकृष्ठ दर्जाचा असल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि चार हजार किलोंचा साठा असा एकूण 8 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. एफडीएने सिया गोयलच्या वकिलांचे दुकानाच सील केलं आहे.
एफडीएने काय म्हटलं आहे?
व्यवसायाचा परवाना नसून दुकानाचा माल निकृष्ठ दर्जाचा आहे. संबंधित आस्थापन हे वैध परवान्याशिवाय व्यवसाय करत असल्याचे आणि अन्न सुरक्षा मानांकनाचे उल्लंघन करत असल्याचे एफडीएच्या लक्षात आलं आहे. विशेष म्हणजे एका ठिकाणी व्यवसाय करण्याचा परवाना असताना दुसऱ्या ठिकाणी व्यवसाय सुरु होता, असा ठपका या दुकानावर आहे
एफडीएने एकूण चार प्रकारचे नमुने घेतले होते. त्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे हळद, एका ब्रँडचे तीळ आणि एका ब्रँडचे सोयाबीनचे नमुने घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी 4 हजार 172 किलोंचा साठा जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत 8 लाख 14 हजार 630 अशी आहे. या तपासणीत त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अन्न पदार्थ कमी दर्जाचे आणि आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.


COMMENTS