पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. आता या शेतकऱ्यांना...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. आता या शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळेल.
तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अटही रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. या निर्णयाचे स्वागत करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
''सततच्या नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळलेले दर या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती. परंतु सदरील कर्जमाफी योजनेत शासनाने २०१९ मधील कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची अट घातली होती. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सन २०२५-२६, २०२६-२७ मधील पीक कर्ज भरण्याची घातलेली अट यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका होता,'' असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लावलेली २०२५-२६ ची अटही हटवून प्रोत्साहनपर अनुदानाचा मार्ग मोकळा केला. हे कोणाचे उपकार नाहीत. हा आपल्या संघर्षाचा, आपल्या एकजुटीचा आणि शेतकऱ्यांच्या प्रचंड दबावाचा विजय असल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे.
सरसकट कर्जमाफीसाठी तुपकर यांनी बुलढाण्यात ५ दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यानंतर विधानभवनासमोर सोयाबीन, कापूस, ज्वारी फेकत आंदोलन केले होते. त्याची सरकारने दखल घेतली आहे.
सरकारकडून कर्जमाफीच्या संदर्भातदोन अटी रद्द करणे हा शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय आहे, असे अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे. २०२६ च्या कर्जमाफी योजनेत ज्या अटी-शर्ती राज्य सरकारने लावल्या होत्या. त्यापैकी दोन प्रमुख अटी- शर्ती, ज्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार होते. याबाबत किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलन केले. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी याबाबत आवाज उठवला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत दोन अटी-शर्ती रद्द करण्याची घोषणा केली. यामुळे लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. यामुळे किसान सभेच्या वतीने सरकारचे अभिनंदन तर मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करत आहोत, असे नवले यांनी सांगितले.


COMMENTS