रोजच्या जेवणानंतर काहींना लगेच झोपण्याची सवय असते, तर काहीजण जेवण संपताच चहा किंवा कॉफी पितात. अशा सवयींमुळे पचनक्रिया मंदावणे, अपचन, गॅस, अ...
रोजच्या जेवणानंतर काहींना लगेच झोपण्याची सवय असते, तर काहीजण जेवण संपताच चहा किंवा कॉफी पितात. अशा सवयींमुळे पचनक्रिया मंदावणे, अपचन, गॅस, अॅसिडिटी आणि शरीराला आवश्यक पोषक घटकांचे योग्य शोषण न होणे अशा समस्या उद्भवू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेवणाइतकेच जेवणानंतरचा दिनक्रमही महत्त्वाचा असतो. योग्य सवयी अंगीकारल्यास पचन सुधारते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे जेवल्यानंतर कोणत्या चुका करु नये, जाणून घ्या.
चायनीज खाताय? सावधान! चवीचा मोह महागात पडणार; नूडल्स, मंच्युरियनमध्ये वापरला जाणारा अजिनोमोटो किती धोकादायक?
जेवणानंतर लगेच झोपू नका
जेवण झाल्यानंतर त्वरित झोपल्यास अन्न व्यवस्थित पचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि अपचनाचा त्रास वाढू शकतो. जेवणानंतर किमान दोन ते तीन तासांनी झोपणे अधिक योग्य मानले जाते
लगेच चहा किंवा कॉफी पिणे टाळा
अनेकांना जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. मात्र या पेयांमधील काही घटक लोहासारख्या महत्त्वाच्या पोषक तत्त्वांच्या शोषणावर परिणाम करू शकतात. त्यामुळे ही पेये काही वेळाने घेणे अधिक फायदेशीर ठरते.
त्वरित व्यायाम करू नका
जेवणानंतर लगेच धावणे, जिममध्ये व्यायाम करणे किंवा जास्त शारीरिक मेहनत घेणे टाळावे. यामुळे पचनक्रियेवर ताण येऊ शकतो. त्याऐवजी काही मिनिटांनी हलके चालणे अधिक उपयुक्त ठरते.
भरपूर पाणी पिऊ नका
जेवणानंतर लगेच मोठ्या प्रमाणात पाणी पिण्याऐवजी थोड्या प्रमाणात पाणी घ्यावे. त्यानंतर काही वेळाने आवश्यकतेनुसार पाणी पिणे अधिक योग्य मानले जाते.
धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन टाळा
जेवणानंतर धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत घातक मानले जाते. यामुळे पचनसंस्थेवर तसेच शरीराच्या इतर अवयवांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो..
लगेच फळे खाणे टाळा
फळे आरोग्यासाठी लाभदायक असली तरी जेवणानंतर लगेच त्यांचे सेवन केल्यास काही व्यक्तींमध्ये पचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे फळे जेवणाच्या काही वेळ आधी किंवा काही वेळानंतर खाणे अधिक योग्य ठरते.
निरोगी पचनासाठी या सवयी अंगीकारा
जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे शांतपणे चालण्याचा प्रयत्न करा.
संतुलित आणि वेळेवर आहार घ्या.
अति खाणे टाळा आणि अन्न नीट चावून खा.
नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप याकडेही लक्ष द्या.
टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.


COMMENTS