पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या हत्या प्रकरणामुळे राज्यासह संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती.ल...
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या हत्या प्रकरणामुळे राज्यासह संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती.लग्नाला काही महिने उरले असताना होणाऱ्या पत्नीने तिच्या प्रियकराबरोबर मिळून केतन अग्रवालची हत्या केली. या हत्येनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असताना डॉ. मुस्कान सोनी नामक एक दंतचिकित्सक महिलेने केतन अग्रवालवर विनोद केला होता. सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता द ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स ऑफ सर्जन असोसिएशनने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मुस्कान यांनी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूवर आक्षेपार्ह, अनुचित आणि अवमानकारक टिप्पणी केली होती. असोसिएशनच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्यात मुस्कान सोनी यांच्यावरील कारवाईचे कारण दिले गेले आहे. डॉ. मुस्कान यांची ५ जुलै २०२५ रोजी असोसिएशनच्या खजिनदारपदावर नियुक्ती करण्यात आली होती.
असोसिएशनने निवेदनात नमूद केल्यानुसार डॉ. मुस्कान यांनी केलेल्या टिप्पणीमुळे असोसिएशनच्या आचारसंहितेचे आणि नैतिक मुल्यांचे उल्लंघन झाले आहे. त्यांच्या अवमानकारक विधानाबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
या टिप्पणीमुळे डॉ. मुस्कान यांच्यावर पाच वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या काळात त्यांच्यावरील सर्व जबाबदाऱ्या काढून घेतल्या आहेत. त्यांचे सदस्यत्व, समितीमधील स्थान आणि असोसिएशनमधील त्यांच्या सहभागावर निर्बंध घातले गेले आहेत. या पाच वर्षांच्या बंदीच्या काळात त्यांना असोसिएशनच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. जोपर्यंत संबंधित विभाग त्यांच्यावरील निलंबन मागे घेत नाही. तोपर्यंत डॉ. मुस्कान यांना असोसिएशनच्या कोणत्याही कामात सहभागी करून घेतले जाणार नाही.



COMMENTS