कोलकात्यात बारावीच्या एका विद्यार्थ्याचा थर्मासमधील उकळता चहा प्यायल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाख...
कोलकात्यात बारावीच्या एका विद्यार्थ्याचा थर्मासमधील उकळता चहा प्यायल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, चहा प्यायल्यानं मृत्यू झाला असं थेट म्हणता येणार नाही.पण शवविच्छेदन अहवालानंतरच सर्व स्पष्ट होईल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. Experts Explain Student's Death After Drinking Hot Tea
कोलकात्यातील नरेंद्रपूर इथं असलेल्या रामकृष्ण मिशन आश्रमात दिप्तांशू महतो हा राहत होता. बारावीत शिकणाऱ्या दिप्तांशूचा उकळता चहा प्यायल्यानं मृत्यू झाल्याचं म्हणत कुटुंबियांनी शाळा व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसात तक्रारही देण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापनाने मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी मी येण्याची वाट का पाहिली? माझ्या मुलाच्या पचनसंस्थेत आणि अन्ननलिकेला आतून गरम चहाचा चटका बसल्याने प्रकृती बिघडल्याचा दावा दिप्तांशूच्या वडिलांनी केलाय.
डॉक्टर रविकांत चतुर्वेदी यांनी म्हटलं की, गरम चहामुळे मृत्यू होऊ शकत नाही. खरं कारण शवविच्छेदन अहवालातून समोर येईल. पण दुर्मीळ प्रकरणात यात अन्ननलिकेला हानी पोहोचल्यानं किंवा अचानक हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू ओढावण्याची शक्यता आहे. याशिवाय थर्मास स्वच्छ नसल्यानं चहातून विषबाधा झाल्याचंही नाकारता येत नाही.
उकळता चहा प्यायल्यानं श्वसन नलिका किंवा अन्न नलिकेवर परिणाम झाला असू शकतो. उकळत्या चहामुळे गळ्यातून मेंदूला जाणारी नस काम करायची बंद पडू शकते. अचानक हृदयविकाराचा धक्काही मृत्यूचे कारण असू शकते असंही तज्ज्ञांनीम म्हटलं आहे.
दिप्तांशूच्या वडिलांनी म्हटलं की, मला सकाळी सव्वा अकरा वाजता फोन आला की दिप्तांशूची तब्येत बिघडलीय. मी १ वाजता पोहोचलो. तोपर्यंत दिप्तांशू तिथेच होता आणि सारखा खोकत होता. त्यानं थर्मासमधून उकळता चहा प्यायल्याचं सांगण्यात आलं. मी शाळेत पोहोचताच त्याला गाडीपर्यंत नेलं आणि तिथं पाण्याचा एक घोट प्यायल्यानंतर बेशुद्ध पडला. बेशुद्धावस्थेत दिप्तांशूला रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी उपचाराला नकार दिला. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचाराआधीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.
इतका उकळलेला चहा असताना तोंड भाजल्यावरही का प्यायला असं वडिलांनी दिप्तांशूला विचारलं होतं. तेव्हा त्याने वडिलांना सांगितलं होतं की, "चहा थुंकला असता तर फरशी खराब झाली असती. फरशी खराब करायची नव्हती म्हणून तो चहा प्यायलो." दिप्तांशूच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता प्रशासनाकडून कारवाईच्या हालचाली केल्या जात आहेत.


COMMENTS