विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले "आधुनिक युगातील गुरूचे स्थान" विषयावर विशेष व्याख्यान…. जुन्नर, दि. २४ जुलै: श्री शिव छत्रपती...
विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले
"आधुनिक युगातील गुरूचे स्थान" विषयावर विशेष व्याख्यान….
जुन्नर, दि. २४ जुलै: श्री शिव छत्रपती महाविद्यालयात वाणिज्य विभाग,संशोधन केंद्र तसेच बी.बी.ए.आणि बी.सी.ए. विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून 'आधुनिक युगातील गुरूचे स्थान' या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र प्रमुख डॉ. एस.जे.जाधव यांच्या प्रास्ताविकाने झाली.त्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे होते.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी स्पष्ट केले की,आपल्या जीवनातील गुरूंची जागा कोणीच घेऊ शकत नाही.आधुनिकतेच्या प्रवाहात तंत्रज्ञान कितीही पुढे गेले,तरी गुरुचे मार्गदर्शन म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ आहे.
Artificial Intelligence (AI) आणि Chat GPT यांसारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर विद्यार्थी ज्ञान मिळवू शकतात, परंतु गुरु आपल्याला जगायला शिकवतात.त्याचबरोबर आपल्यातील क्षमता व कौशल्ये ओळखून आपल्याला मार्गदशन करतात.संस्कार,करुणा,सहानभूती,संवेदनशीलता,भावभावना यांसारख्या मानवी मुल्यांची जागा घेऊ शकत नाही. असे त्यांनी प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांना ज्ञानाची गंगा, शिस्तीचे पालन आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन करत, "ग्रंथ हेच मानवाचे खरे आणि चिरंतन मार्गदर्शक गुरु आहेत" या विचारांवर भर देत त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथांशी मैत्री करण्याचे आवाहन केले.
गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव तथा दादासाहेब काळे यांच्या अभिप्रेरणेने आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमास त्यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी, उपप्राचार्य व विज्ञान शाखा प्रमुख डॉ.आर.डी.चौधरी,कला शाखा प्रमुख डॉ.ए.एस.पाटील यांचे मार्गदशन व सहकार्य लाभले. यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या रसाळ वाणीतून आणि भावनांनी नटलेल्या शब्दांतून गुरुंप्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रबोधनात्मक नाट्यछटा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अगदी उस्फूर्तपणे व उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमात रंग भरले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार व सूत्रबद्ध सूत्रसंचालन अल्फिया पठाण या विद्यार्थिनीने केले, तर उपस्थितांचे मनःपूर्वक आभार अनघा ताजणे या विद्यार्थिनीने मानले.
या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र तसेच बी.बी.ए.आणि बी.सी.ए.विभागातील सर्व प्राध्यापक वृंद,सर्व विद्यार्थी व इतर शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरु-शिष्याच्या या पवित्र नात्याची आठवण करून देत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.


COMMENTS