मुलाला नोकरी लागल्या तो खूश होता. कष्टाने राबलेले हात आणि थकलेले पाय आता थोडी तरी विश्रांती घेतील असं त्याला वाटत होतं. आता बाबाची धावपळ थ...
मुलाला नोकरी लागल्या तो खूश होता. कष्टाने राबलेले हात आणि थकलेले पाय आता थोडी तरी विश्रांती घेतील असं त्याला वाटत होतं. आता बाबाची धावपळ थोडी कमी होईल असं वाटत होतं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.चार भाऊ असल्याने ते कुटुंबाचा कणा होते. आपल्या कुटुंबासोबत भावांनाही ते मदत करायचे. काम शोधायला म्हणून भर पावसात ते गेले आणि घरी परतलेच नाहीत. घरी त्यांचा मृतदेह आला, परिस्थिती इतकी वाईट होती की पत्नीलाही मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झालं शर्टवरुन मृतदेहाची ओळख पटवावी लागली तर मुलगा अजून त्या धक्क्यातून सावरू शकला नाही.
सरकारकडून मदतीचे पैसे येतील पण त्या मुलाचा बाप मात्र काही केल्या परत येऊ शकणार नाही. त्याची उणीव त्याची जागा कुणी भरून काढू शकणार नाही. पत्नी आणि मुलगी धाय मोकलून रडल्या. साकीनाका परिसरात काम सुरू असताना अस्लम शेख यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. जवळपास तीन ते चार तासांच्या प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह दुसऱ्या मॅनहोलमधून बाहेर काढण्यात यश आलं. जिथे काम सुरू होतं तिथे कोणतेही बॅरिकेट लावण्यात आले नव्हते. अस्लम शेख फोनवर बोलत असताना अचानक ते झाकण उघडं असलेल्या मॅनहोलमध्ये पडले आणि घात झाला.
अस्लम यांच्या मृत्यूनंतर पत्नीने त्यांच्या कपड्यांवरून ओळख पटवली. मुलीनं टाहो फोडला, मुलालाही मोठा धक्का बसला आहे. जो बाप रात्रंदिवल मजुरी करून राबला. त्याला आराम मिळावा यासाठी मुलगा धडपड करत होता. वडिलांना मात्र घरची आणि भावांची परिस्थिती माहिती होती त्यामुळे ते पुन्हा कामाच्या शोधात निघाले होते, पावसामुळे काम मिळत नसल्याने अस्लम शेख १०.४५ वाजण्याच्या सुमारास मोबाईलवर बोलत घरी जायला निघाले. तो कॉल मात्र त्यांच्या आयुष्यातला शेवटचा ठरला.
काही दिवसांपूर्वीच अस्लम यांच्या धडपडीला यश आले. त्यांचा मुलगा अली याला मरोळमधील एका कार्यालयात नोकरी मिळाली. तोपर्यंत केवळ रोजंदारीवर चालणाऱ्या घरात एकाएकी आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वडिलांचे कष्ट जवळून पाहिलेल्या अलीच्या मनात एकच भावना होती की, "आता बाबांची थोडी धावपळ कमी होईल." वयाच्या या टप्प्यावर आता वडिलांना जास्त कष्ट करावे लागणार नाहीत, हा विचार करून अली सुखावला होता. मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.
मुंबईच्या गजबजलेल्या साकीनाका भागातील शंकरशेट चाळीत राहणारे शेख कुटुंब. घरात चार भाऊ आणि त्यामध्ये सर्वात मोठे अस्लम शेख. अस्लम यांच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. रोज सकाळी उठायचे, खैराणी रोड परिसरातील विविध बांधकामांच्या ठिकाणी जायचे आणि डंपरमध्ये माती व ढिगारा भरण्याचे कष्टाचे काम करायचे, हा त्यांचा रोजचा दिनक्रम. दिवसभराच्या अतोनात कष्टानंतर त्यांच्या हातावर ४०० ते ५०० रुपये पडायचे.
अस्लम यांची स्वप्ने खूप मोठी नव्हती. रोज दोन वेळचे पोट भरावे, मुलांचे शिक्षण नीट पूर्ण व्हावे आणि आपले मुलं आपल्यापेक्षा चांगले आयुष्य जगावेत, एवढीच एक प्रामाणिक धडपड त्यांच्या आयुष्यात होती. ज्या वडिलांनी आयुष्यभर रक्ताचे पाणी करून मुलांना मोठे केले, त्यांच्या सुखाचे दिवस पाहायची वेळ आली तेव्हाच नियतीने त्यांना हिरावून नेले. शेख कुटुंबावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर पाहून संपूर्ण साकीनाका परिसर हळहळला.
मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला. त्याआधी एक अधिकारी देखील मॅनहोलमध्ये पडता पडता वाचला होता. या सगळ्यानंतर महापौर आणि उपमहापौर यांच्यासमोर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, या सगळ्या प्रकरणानंतर तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील केली आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असून तिथे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली आहे.


COMMENTS