पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्ष...
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये ठाणे जिल्हा परिषद शाळांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे.जिल्ह्यातील एकूण ३९५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये इयत्ता पाचवीचे ३८४ आणि इयत्ता आठवीचे ११ विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही गटांमध्ये शहापूर तालुक्याने सर्वाधिक यश मिळवत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये ठाणे जिल्हा परिषद शाळांनी उल्लेखनीय कामगिरी करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातील ६६० शाळांमधील ५,०१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४,६७० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. या परीक्षेत ३८४ विद्यार्थी पात्र ठरले असून, १५२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. तालुकानिहाय निकालात शहापूर तालुक्याने सर्वाधिक २५६ विद्यार्थी पात्र ठरवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. मुरबाड तालुक्यात ६७, भिवंडीमध्ये ३४, कल्याणमध्ये १६ आणि अंबरनाथमध्ये ११ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातील ८० शाळांमधील ६८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६१५ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. या गटात ११ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. शहापूर तालुक्यातील ८ विद्यार्थी पात्र ठरले असून ७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. मुरबाड तालुक्यात २, तर अंबरनाथ तालुक्यात १ विद्यार्थी पात्र ठरला आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन, मुख्याध्यापकांचे नियोजन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले.


COMMENTS