लोहगडावरून ढकलून देत केतन अग्रवाल याची हत्या करणाऱ्या सियाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा साखरपुडा...
लोहगडावरून ढकलून देत केतन अग्रवाल याची हत्या करणाऱ्या सियाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा साखरपुडा झाला होता. पण सियाला हे लग्न करायचं नसल्यानं तिने प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनला लोहगडावरून ढकलून त्याची हत्या केल्याचे आरोप होत आहेत.या प्रकरणी सिया आणि चेतनला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत अनेक खुलासे झाले आहेत.
सिया आणि चेतन चौधरी यांच्या व्हॉटसअप चॅटचा डेटा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यात गेल्या ६ ते ८ महिन्यात दोघांमध्ये झालेल्या संवादातून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. यात सिया आणि चेतन यांनी चार महिन्यापूर्वीच लग्न केल्याचं समोर आल्याचा दावा पोलिसांनी केलाय.
घरच्यांचा विरोध असल्यानं सिया आणि चेतन यांनी चार महिन्यापूर्वी गुपचूप लग्न केलं होतं. त्यांच्या या लग्नाचा खुलासा व्हॉटसअप चॅटमधून झाला आहे. आता या माहितीमुळे हत्याकांडाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या हाती तांत्रिक पुरावे आणि माहिती लागली असून त्याचा तपास केला जात आहे.केतनची हत्या करण्याचा प्लॅनही सियाने केला होता. मात्र तिचं धाडस होत नसल्यानं चेतनला सोबत येण्यासाठी सिया विचारत होती. यासंदर्भातही दोघांमध्ये व्हॉटसअपवर चर्चा झाली होती. माझं धाडस होत नाहीय, तूसुद्धा सोबत चल. आपण दोघं त्याला दरीत ढकलून देऊ असा मेसेज सियाने चेतनला पाठवल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.


COMMENTS