माझं वक्तव्य फक्त पुणे-नाशिक रेल्वेच्या संदर्भात होतं. त्याचा वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न झाला," असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस...
माझं वक्तव्य फक्त पुणे-नाशिक रेल्वेच्या संदर्भात होतं. त्याचा वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न झाला," असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिले.पुणे-नाशिक रेल्वेची मागणी संगमनेर, जुन्नर, अकोले, मंचर आणि परिसरातील नागरिकांची असल्याचेही त्यांनी नमूद केले. या मागणीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षातील एकजुटीबाबतही कोल्हे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. "राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष एकत्र आहे आणि एकत्रच राहील. आम्ही सर्व खासदार एकसंघ आहोत. शरद पवार बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणे एकत्र आहोत," असे ते म्हणाले.यापूर्वी महायुतीमधून ऑफर आल्यास विचार करू, असे वक्तव्य आणि राज्यातील पायाभूत सुविधा विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा करत कोल्हे यांनी त्या चर्चांना स्पष्टीकरणातून उत्तर दिले.


COMMENTS