तुम्हाला कोणी सांगितलं की, एका शेळीचं दूध चक्क १५० ते २०० रुपये लिटरने विकलं जातं, तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे शंभर टक्के खरंय. शेतीला...
तुम्हाला कोणी सांगितलं की, एका शेळीचं दूध चक्क १५० ते २०० रुपये लिटरने विकलं जातं, तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे शंभर टक्के खरंय. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता एक परदेशी जात अक्षरशः 'सोन्याची खाण' ठरत आहे.आपल्याकडच्या गावरान शेळ्या फार तर एक-दोन कप दूध देतात. पण स्वित्झर्लंडची ‘सानन’ नावाची ही शेळी दुग्धोत्पादनात भल्याभल्या गाई-म्हशींनाही जोरदार टक्कर देत आहे. जगभरात सर्वाधिक दूध देणारी शेळी म्हणून तिची ओळख असून, सध्या भारतीय बाजारात या शेळीला प्रचंड मागणी आहे.
सानन जातीची ही शेळी योग्य निगा राखल्यास आणि चांगला चारा मिळाल्यास दिवसाला सहज ३ ते ५ लिटर दूध देते. वर्षभराचा हिशेब केला तर हा आकडा थेट ८०० ते १००० लिटरच्या घरात जातो. त्यामुळेच व्यावसायिक शेळीपालनासाठी किंवा बचत गटांसाठी ही जात अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
या शेळीचं दूध केवळ घट्ट आणि पौष्टिकच नसतं, तर त्यापासून दर्जेदार पनीर, तूप आणि खवा तयार होतो. दुसरीकडे, आजकाल सौंदर्यप्रसाधनांमध्ये शेळीच्या दुधाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने, बाजारात सानन शेळीच्या दुधाला विक्रमी भाव मिळतो.
आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही शेळी विकत घ्यायची कशी आणि तिची किंमत किती? भारतीय बाजारात वय, आरोग्य आणि दूध देण्याच्या क्षमतेनुसार सानन शेळीची किंमत २५ हजार ते ४० हजार रुपयांच्या घरात आहे.
तुम्हाला उच्च दर्जाची आणि नोंदणीकृत शेळी हवी असल्यास त्यासाठी ५० ते ६० हजार रुपये मोजावे लागू शकतात. तर, चांगल्या पैदाशीसाठी बोकड खरेदी करायचा असल्यास २० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. एकूणच, कमी खर्चात जास्त नफा कमवायचा असेल, तर सानन शेळी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी हुकमी एक्का ठरू शकते.


COMMENTS