उत्तर प्रदेश पोलिसांनी 'गँगस्टर ॲक्ट' (गुंडगिरी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत राज्याबाहेर पहिली मोठी कारवाई केली आहे. धाराशिव जिल्ह्यात...
उत्तर प्रदेश पोलिसांनी 'गँगस्टर ॲक्ट' (गुंडगिरी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत राज्याबाहेर पहिली मोठी कारवाई केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल १०० कोटी रुपये मुल्य असलेल्य कारखान्यावर जप्ती आणली आहे.
उत्तर प्रदेशचे तुरुंगात असलेले माजी आमदार विजय मिश्रा यांच्याशी संबंधित ही मालमत्ता असल्याचे सांगितले जाते. गुन्हेगारीच्या माध्यमातून कमावलेल्या पैशातून सदर मालमत्ता निर्माण केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या अँटी-माफिया मोहिमेतील ही एक अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जाते. या कारवाईमुळे माजी आमदार विजय मिश्रा आणि त्यांच्या गुन्हेगारी साखळीवर मोठी आर्थिक टाच आणली आहे. मिश्रा यांची एकूण २४१.५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर आतापर्यंत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील जकेकुर गावात असलेली ‘लाली ॲग्रो इंडस्ट्रीज’ हा कारखाना गेल्या १५ वर्षांपासून सुरू होता. सदर कारखाना विजय मिश्रा यांचे जावई मुकेश तिवारी यांनी सुरू केला होता. मात्र कारखाना उभारण्यासाठी विजय मिश्रा, त्यांची पत्नी राम लाली, मुलगा विष्णू आणि त्यांच्या टोळीतील इतर सदस्यांनी अवैध मार्गाने कमावलेल्या पैशांचा वापर केला, असा आरोप पोलिसांनी केला आहे.
भदोही पोलिसांनी महाराष्ट्र प्रशासनाशी समन्वय साधून आणि आवश्यक त्या सर्व कायदेशीर परवानग्या मिळवून ही जप्तीची कारवाई पूर्ण केली. भदोहीचे पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांनी सांगितले की, संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून निर्माण केलेली साम्राज्ये उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे.
कारखान्यावर कारवाई करताना यूपी आणि महाराष्ट्र पोलीस
कोण आहेत विजय मिश्रा?
विजय मिश्रा हे भदोहीच्या ज्ञानपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी २००२, २००७ आणि २०१२ मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर, तर २०१७ मध्ये निषाद पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला होता.
पोलिसांच्या नोंदीनुसार, विजय मिश्रा यांच्यावर आजवर तब्बल ८७ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ७ प्रकरणांमध्ये त्यांना न्यायालयाने दोषी ठरवले असून इतर खटले अद्याप प्रलंबित आहेत. २०२० पासून ते आग्रा मध्यवर्ती कारागृहात आहेत.
बॉम्बस्फोटाचाही आरोप
विजय मिश्रा यांच्यावर बॉम्बस्फोटाचाही खटला सुरू आहे. २०१० मध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मंत्री नंद गोपाळ गुप्ता ऊर्फ ‘नंदी’ यांना मारण्यासाठी रिमोट-कंट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला होता. प्रयागराज येथे झालेल्या या स्फोटात ‘द इंडियन एक्सप्रेस’चे ज्येष्ठ पत्रकार विजय प्रताप सिंह यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला होता, तर चार जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी विजय मिश्रा यांच्यासह १६ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.


COMMENTS