पुणे: पुणे महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने राज्यातील अनेक बेरोजगार तरुण-तरुणींची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्...
पुणे: पुणे महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने राज्यातील अनेक बेरोजगार तरुण-तरुणींची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पुणे मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांनी या तक्रारीवरून जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर, शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता गोवर्धन बनसोडे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार,हा गैरप्रकार मे 2022 ते मे 2024 या दोन वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या आवारात आणि शहरात इतर ठिकाणी घडला.या टोळीने पाटण येथील एका सुशिक्षित तरुणाला मनपाच्या भवन विभागात ‘कनिष्ठ अभियंता’ पदावर कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे मोठे आमिष दाखवले होते. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी त्याला टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती झाल्याचा बनावट आदेशही दिला. या बदल्यात त्या तरुणाकडून तब्बल 45 लाख रुपये उकळण्यात आले. मात्र, बरेच दिवस उलटूनही नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने कायदेशीर नोटीस पाठवली.
महापालिकेने जेव्हा या कागदपत्रांची कसून तपासणी केली, तेव्हा वरिष्ठ उपायुक्त आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या, बनावट लेटरहेड, शिक्के आणि वॉटरमार्क वापरून हा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले.दुसरीकडे, या प्रकरणात नाव आलेले जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी पत्रकाद्वारे सर्व आरोप फेटाळले आहेत. “या प्रकरणात माझा कोणताही थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध नाही. उलट पीडित तरुणांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. माझी जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी आणि पोलिसांनी बँक खाती तसेच कॉल रेकॉर्ड्सची सखोल चौकशी करून खऱ्या गुन्हेगारांना समोर आणावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
या टोळीने महाराष्ट्रातील अनेक बेरोजगारांना रोख रक्कम आणि चेकच्या माध्यमातून लाखो रुपयांना लुटल्याचा पोलिसांना संशय आहे. या मोठ्या रॅकेटमध्ये महापालिकेतील आणखी काही वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी सामील आहेत का, याचा शोध घेण्यासाठी शिवाजीनगर पोलीस आरोपींचे आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांची कसून तपासणी करत आहेत.


COMMENTS