नवी मुंबई: नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशभरात आज डॉक्टर्स डे साजरा केला जात आहे. पण, नवी मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णा...
नवी मुंबई: नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशभरात आज डॉक्टर्स डे साजरा केला जात आहे. पण, नवी मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयामध्ये एका गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. उपचारावेळी चुकीचा डोस दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात ही घटना घडली. सोनम करण डोंगरे (वय १९) असं मृत महिलेचं नाव आहे. ही महिला गरोदर होती. पोटात पाणी कमी असल्यामुळे एरोलीतील पालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी तिला कोणतं तरी इंजेक्शन दिलं होतं. त्यानंतर महिलेची प्रकृती खालावली, ३ तास ही महिला रुग्णालयात बेशुद्ध होती. त्यानंतर वाशी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान हा महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला.
याच रुग्णालयामध्ये आणखी एका महिलेला दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर सुद्धा अशाच प्रकार उपचार करण्यत आले, यामध्ये ही महिलाही आता गंभीर अवस्थेत आहे. इंजेक्शन दिल्यानंतर रिअॅक्शन झालं आहे. त्या महिलेला आता वाशी रुग्णालयात दाखल केलं आहे. याबद्दल डॉक्टरांना विचारणा केली पण, उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहे, या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी केली.
पतीचं काय म्हणणंय?
30 जून रोजी मी माझ्या पत्नीला रुग्णालयात दाखल केलं होतं. तिचा आठवा महिना सुरू होता. दुपारी तिला कोणतं तरी इंजेक्शन दिलं, त्यानंतर तिला रिअॅक्शन झालं. त्यानंतर ती बेशुद्ध पडली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिला वाशीच्या रुग्णालयात दाखल करण्याचं सांगितलं, आम्ही वाशीच्या रुग्णालयात घेऊन आल्यानंतर तासाभरात माझ्या पत्नीचा मृत्यू झाला.आम्हाला न्याय पाहिजे, हे असं का घडलं, याचा मला जाब पाहिजे, असं म्हणत महिलेच्या पतीला अश्रू अनावर झाले.
आरोग्य समिती सभापतींनी दिले चौकशीचे आदेश
दरम्यान, याबद्दल रुग्णालयाकडून अद्याप डॉक्टरांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी आरोग्य समिती सभापती डॉ जयाजी नाथ यांनी प्रतिक्रिया दिली. "आज या रुग्णालयात दुर्दैवी घटना घडली. या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दुसरी महिला ही व्हेंटिलेटरवर आहे. यामध्ये कुणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल' असं आश्वासन जयाजी नाथ यांनी दिलं.
तर, नवी मुंबईतील उपचारादरम्यान झालेल्या आई आणि बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात येईल. या समितीत नवी मुंबई महापालिका वगळता इतर चार महापालिकेच्या तज्ञ डॉक्टरांचा सहभाग असेल, अशी प्रतिक्रिया महापौर सुजाता पाटील यांनी दिली.


COMMENTS