आयोध्या - राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणाच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस तपासानुसार, २०२५ मधील महाकुंभ काळात मंदिर...
आयोध्या - राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणाच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस तपासानुसार, २०२५ मधील महाकुंभ काळात मंदिरात सर्वाधिक देणगी जमा होत असताना सर्वांत मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे.या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींपैकी लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा हे एकमेकांचे मेहुणे आहेत. त्यांनी सर्वाधिक रक्कम लंपास केल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. दरम्यान, अपहार प्रकरणाचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथकाला (एसआयटी) १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. देणगीतील रक्कम कशी चोरली जात होती, याबाबत महत्त्वाची माहिती आरोपींनी दिल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे.
आरोपींना सीसीटीव्हींची अचूक माहिती होती. कॅमेऱ्यांच्या नजरेआड असलेल्या जागांचा वापर करून पैसे चोरले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. दानातील पैसे मोजणी कक्षातून प्रथम मंदिर परिसरातील स्वच्छतागृहांमध्ये लपवून ठेवले जात असत. वर्दळ कमी झाल्यानंतर आणि कोणालाही संशय येणार नाही, याची खात्री झाल्यानंतर ही रक्कम बाहेर काढली जात होती.या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी पोलिस करीत आहेत. मोजणी कक्षातील कॅमेरे कोणत्या दिशेला आहेत, कोणत्या भागात चित्रण होत नाही, याची आरोपींना पूर्ण कल्पना होती. रोकड चोरताना एक जण पैसे स्वतःजवळ ठेवत असे, तर इतर कर्मचारी त्याला चारही बाजूंनी घेरत असत, जेणेकरून कॅमेऱ्यात चोरीचे दृश्य स्पष्ट दिसू नये.
मालमत्ता खरेदी
महाकुंभादरम्यान देश-विदेशातून लाखो भाविक अयोध्येत आले होते. त्यामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणात देणगी येत होती. दान दिले जात होते. याच संधीचा फायदा घेत लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा यांनी आरोपींनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तपासात या दोघांनी चोरीच्या पैशातून सहापेक्षा अधिक मालमत्ता खरेदी केल्याचेही समोर आले आहे.टिन्नूच्या घरातून रोकड जप्त
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या टिन्नू यादवकडे देणगी मोजणी कक्षाची किल्ली असायची असे पोलिसांनी सांगितले. तो ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांच्या वाहनाचा चालक होता. त्याच्या घरातूनही रोकड जप्त करण्यात आली आहे.
'राम राज्य कोष'
मुख्य आरोपी अविनाश शुक्ला याच्या भावाच्या योग केंद्रावर घातलेल्या छाप्यात चार पेट्यांमध्ये ठेवलेली मोठी रोकड जप्त करण्यात आली. नोटांची बंडले चादरीमध्ये लपवून ठेवली होती. एका पेटीवर 'राम राज्य कोष' असे लिहिलेले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. डिजिटल पेमेंटसाठी यावर क्यूआर कोडही आढळल्याने त्याचीही चौकशी सुरू आहे.


COMMENTS