नागपूर : कावरापेठ रेल्वे उड्डाणपुलाच्या चुकीच्या आराखड्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी कोंडी वाढल्याचा आरोप होत असून, १८० कोटींच्या प्रकल्...
नागपूर : कावरापेठ रेल्वे उड्डाणपुलाच्या चुकीच्या आराखड्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी कोंडी वाढल्याचा आरोप होत असून, १८० कोटींच्या प्रकल्पानंतर आता 'जंक्शन' सुधारण्यासाठी नव्या आराखड्याची तयारी सुरू झाली आहे.
अपेक्षित वाहतूक प्रवाहाऐवजी कोंडीची समस्या
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरातील कावरापेठ रेल्वे उड्डाणपूल सध्या नियोजनातील त्रुटींमुळे चर्चेत आला आहे. वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या पुलावरून अपेक्षित वेगाने वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही. पुलावरील आणि उताराच्या भागातील 'जंक्शन' रचनेतील त्रुटींमुळे वाहनचालकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कळमना मार्गावरून सुरू होणारा हा उड्डाणपूल दोन रेल्वेमार्ग ओलांडत पुढे तीन दिशांना विभागला जातो. शांतीनगर-राजीव गांधीनगर आणि कावरापेठ येथील विद्यमान उड्डाणपुलांना तो जोडण्यात आला आहे. मात्र, पुलाला स्वतंत्र उतार (लँडिंग) उपलब्ध नसल्याने तो पूर्ण क्षमतेने वापरात आणता आलेला नाही.
'टी-पॉइंट'मुळे अपघाताचा धोका वाढला
उड्डाणपुलाच्या सद्यस्थितीमुळे जुना कामठी रोडकडील वाहतूक शांतीनगर-राजीव गांधीनगर उड्डाणपुलाकडे वळवण्यात आली आहे. परिणामी या परिसरात वाहनांची गर्दी वाढली असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शांतीनगर घाटाकडून जुनी कामठीकडे जाणारी वाहने आणि राजीव गांधीनगरकडून येणारी वाहने एकाच ठिकाणी एकत्र येत असल्याने धोकादायक 'टी-पॉइंट' तयार झाला आहे. रस्त्याचा अपुरा विस्तार, दुभाजकामुळे निर्माण झालेला अडथळा आणि यू-टर्नची अपुरी व्यवस्था यामुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर झाली आहे
रेल्वे फाटकाची समस्या सोडविण्यासाठी उभारला होता पूल
या भागातील तीन रेल्वेमार्गांवरील फाटकांमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे एक किलोमीटर लांबीचा रेल्वे उड्डाणपूल उभारला. या प्रकल्पासाठी १८० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आतापर्यंत १४१.६२ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती आहे. कळमना-राजीवनगर रेल्वे उड्डाणपुलासाठी सप्टेंबर २०२१ मध्ये कार्यादेश देण्यात आला होता. सप्टेंबर २०२४ मध्ये काम पूर्ण झाले. मात्र, वाहतुकीच्या नियोजनातील त्रुटींमुळे प्रकल्पाचा अपेक्षित लाभ अद्याप मिळालेला नाही.
विकासाच्या नावावर गडचिरोलीतील संसाधनांची लूट; आदिवासी मात्र विकासापासून वंचित - अंबादास दानवे
सुधारणा आराखडा मंजुरीसाठी मंत्रालयाकडे
उड्डाणपुलावरील 'जंक्शन' सुधारणा प्रकल्पाचे सादरीकरण नुकतेच करण्यात आले आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग (जीएडी) तयार करून मंजुरीसाठी मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत. प्रस्तावित सुधारणांमध्ये जंक्शनची पुनर्रचना, वाहतूक मार्गांचे विभाजन, सिग्नल व्यवस्थेतील बदल आणि आवश्यक सुविधा उभारण्याचा समावेश आहे. मात्र, मूळ प्रकल्पाच्या आरेखनातील त्रुटींमुळे अतिरिक्त खर्चाची वेळ का आली, तसेच या त्रुटींसाठी जबाबदार अधिकारी, सल्लागार किंवा संबंधित यंत्रणांवर आर्थिक जबाबदारी निश्चित केली जाणार का, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे..


COMMENTS