ओटवणे (सिंधुदुर्ग) : येथे वटपौर्णिमेच्या दिवशी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा करून व्रत ...
ओटवणे (सिंधुदुर्ग) : येथे वटपौर्णिमेच्या दिवशी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा करून व्रत पूर्ण केलेल्या सुमिता सुरेश राऊळ (वय ५५) यांना काही क्षणांतच हृदयविकाराचा तीव्र झटका आला.उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. आनंदाचा आणि मंगलमय मानला जाणारा वटपौर्णिमेचा दिवस त्यांच्या कुटुंबासाठी मात्र आयुष्यभराची वेदना ठरला.
ओटवणे शेरवाळवाडी येथील सुमिता राऊळ यांनी इतर सुवासिनींप्रमाणे वटपौर्णिमेचे व्रत केले होते. सोमवारी सकाळी त्या शेरवाळवाडी ब्राह्मण मंदिराजवळील वटवृक्षाची पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. विधिवत पूजा करून इतर महिलांसह त्या वाण देण्याच्या आणि गप्पागोष्टींच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. वातावरण आनंदी आणि उत्साहपूर्ण असतानाच अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
काही क्षणांतच त्यांना तीव्र चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. उपस्थित महिलांनी तातडीने ही माहिती पुरुषांना दिली. त्यानंतर त्यांना तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे व्रत करून प्रार्थना करणाऱ्या या सावित्रीला स्वतःचाच जीव गमवावा लागल्याने संपूर्ण परिसर हळहळला आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने शेरवाळवाडीसह ओटवणे गावावर शोककळा पसरली आहे. सुमिता राऊळ यांच्या मागे पती, दोन मुलगे, दीर, पुतणी असा परिवार आहे. येथील संदेश राऊळ व समीर राऊळ यांच्या त्या आई होत. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अनपेक्षित घटनेने हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


COMMENTS