पावसाळ्यात सुरक्षिततेच्या गप्पा मारणाऱ्या महावितरणचा आणखी एक भयंकर आणि जीवघेणा निष्काळजीपणा समोर आला. बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महावि...
पावसाळ्यात सुरक्षिततेच्या गप्पा मारणाऱ्या महावितरणचा आणखी एक भयंकर आणि जीवघेणा निष्काळजीपणा समोर आला. बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महावितरणच्या गलथान कारभारामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन निष्पाप तरुण शेतकऱ्यांचा जागीच बळी गेला आहे.कुठे तुटलेले पोल, कुठे लोंबणाऱ्या जीवघेण्या तारा, तर कुठे थेट लोखंडी खांबांमध्येच उतरलेला विद्युत प्रवाह... या उघड्या नागड्या मृत्यूच्या सापळ्यांकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केल्यामुळेच या दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याने जिल्ह्यातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
तरणीताठ्या पोराचा मृत्यू ; उगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर
पहिली घटना शिरूर कासार तालुक्यातील हाजीपूर येथे घडली. कृष्णा मच्छिंद्र उगले हा तरुण शेतकरी आपल्या शेतात नेहमीप्रमाणे मशागतीचे काम करत होता. मात्र, महावितरणने ३३ केव्ही लाईनचे काम अर्धवट सोडून दिल्यामुळे तेथे लोंबकळणाऱ्या विद्युत तारेचा कृष्णाला स्पर्श झाला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेतील सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वीच कृष्णाच्या मोठ्या भावाचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता. त्या दुःखातून कुटुंब सावरत नाही तोच, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे उगले कुटुंबाने आपला दुसरा मुलगाही गमावला. एकाच महिन्यात दोन तरुण मुलं डोळ्यांदेखत गेल्याने या कुटुंबावर आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेतात गेला अन् परत आलाच नाही; २६ वर्षांच्या माऊलीचा करुण अंत
दुसरी दुर्दैवी घटना वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे घडली. येथील २६ वर्षांचा तरुण शेतकरी माऊली दिलीप गोंडे हा नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी गेला होता. मात्र, शेतातील वीज पोलमध्ये आधीच विद्युत प्रवाह (करंट) उतरलेला होता. कामाच्या गडबडीत माऊलीचा या पोलला स्पर्श झाला आणि शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. माऊलीच्या निधनाने चिंचोटी परिसरावर शोककळा पसरली आहे.
"आणखी किती बळी घेणार?" गावकऱ्यांचा संताप
पावसाळ्याचे दिवस असतानाही ग्रामीण भागातील जुन्या आणि धोकादायक वीज वाहिन्यांची दुरुस्ती का केली गेली नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महावितरणच्या या मनमानी आणि बेजबाबदार कारभारामुळे दोन तरुणांचे प्राण गेल्याने बीडमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. जर तात्काळ जिल्ह्यातील धोकादायक पोल आणि तारांची दुरुस्ती झाली नाही, तर महावितरण विरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.


COMMENTS