नीट पेपरफुटी घोटाळ्यावरुन राज्यासह देशाचं राजकारण तापलं आहे. परिणामी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गे...
नीट पेपरफुटी घोटाळ्यावरुन राज्यासह देशाचं राजकारण तापलं आहे. परिणामी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या दोन आठवड्यां हुन अधिक काळापासून उपोषण करतायत.
अशातच आता त्यांची तब्येत खालावत असताना देशभरातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. अशातच देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने कारवाईचा धडाका लावत महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, लातूर, बीडमधून अनेकांना अटक केली आहे. तर याप्रकरणात पेपरफुटीचा मास्टरमाईंड असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी आणि त्यांच्याशी संबंधित शिवराज मोटेगावकर संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मोटेगावकरने केमिस्ट्रीच्या प्रश्नांसाठी 5 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या तपासामध्ये हि धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मोटेगावकरने पी.व्ही.कुलकर्णींकडून हेप्रश्न मिळवले होते, अशीदेखीलमाहितीआहे. दरम्यान सीबीआयच्या तपासामध्ये मोटेगावकरच्या फोनमध्ये केमिस्ट्रीचे 132 प्रश्न मिळालेआहे. तर प्रश्नपत्रिकेच्या 36 इमेज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये मिळाल्या आहेत. दरम्यान, मोटेगावकरकडील 132 प्रश्नांपैकी 111 प्रश्न नीटच्या परीक्षेत उतरले असल्याचा धक्कादायक खुलासा देखील या तपासातून पुढे आला आहे.
दुसरीकडे, देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता मोठ्या आर्थिक व्यवहारांची जोड मिळताना दिसत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अटक आरोपी शिवराज मोटेगांवकर आणि त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित बँक खाती आणि लॉकर्सची पडताळणी आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) सुरू करण्यात आली आहे. सीबीआयचे पथक या लॉकर्समध्ये मोठी रोख रक्कम, बेकायदेशीर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि बँक व्यवहारांची माहिती शोधत आहे. या आंतरराज्यीय पेपर लीक रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज सीबीआयच्या हाती लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणात नव्याने चर्चेत आलेल्या आणि कोचिंग विश्वात वेगळी ओळख असलेल्या शिवराज मोटेगावकर यांचा आधीचा काळ अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका अत्यंत गरीब आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने उच्च शिक्षणासाठी ते लातूरला आपल्या मोठ्या बहिणीकडे आले. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून (नांदेड) एम.एस्सी. (केमिस्ट्री) ही पदवी पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कौटुंबिक जबाबदारी आणि स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी त्यांनी लातूरमध्ये 'होम ट्युशन' (घरोघरी जाऊन शिकवणी) घेण्यास सुरुवात केली होती. मात्र काळ बदलत गेला तसं सुरुवातीला केवळ केमिस्ट्री विषयापुरता मर्यादित असलेला हा क्लास पुढे विस्तारत गेला. अलीकडे 'आरसीसी'चा झपाट्याने विस्तार झाला आणि आज या क्लासेसची वार्षिक उलाढाल जवळपास 100 कोटींच्या घरात पोहोचली असल्याची माहिती आहे.


COMMENTS