जयपूर : जयपूर येथील नीरज शर्मा यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला एक नवीन वळण लागले आहे. नीरज यांचे पती विजय शर्मा यांचा गेल्याच वर्षी झाले...
जयपूर : जयपूर येथील नीरज शर्मा यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला एक नवीन वळण लागले आहे. नीरज यांचे पती विजय शर्मा यांचा गेल्याच वर्षी झालेला मृत्यूही नैसर्गिक नव्हता, असा आरोप त्यांच्या मेहुण्याने केला आहे.
त्यामुळे आईचा जीव घेणारी २३ वर्षीय मुलगी आयुषी शर्मा हिनेच वडिलांनाही ठार मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस आता २०२५ मधील विजय शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यूचीही चौकशी करत आहेत.
कौटुंबिक मालमत्ता आणि सरकारी नोकरीशी संबंधित एका मोठ्या कटाचा भाग म्हणून विजय शर्मा यांच्या मृत्यूमागे त्यांची मुलगी आयुषी शर्मा हिचा सहभाग होता, या नीरजच्या भावाच्या आरोपांची पडताळणी आता तपास अधिकारी करत आहेत. आयुषी शर्मा हिला तिच्या आईच्या हत्येप्रकरणी आधीच अटक करण्यात आली आहे.
आईच्या हत्येचा कट
पोलिसांनी आयुषी शर्माला तिची आई नीरज शर्मा यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली असतानाच ही नवीन घडामोड समोर आली आहे. या कटात तिचे काका मोहन स्वरुप, तिचा चुलत भाऊ बलराम (उर्फ रवी) जो अद्याप फरार आहे आणि इतर काही आरोपींचाही सहभाग होता.
आईच्या खुनाला अपघाताचे रुप देण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज शर्मा या न्यायालयात 'लोअर डिव्हिजन क्लर्क' किंवा एलडीसी म्हणून कार्यरत होत्या. पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांना नोकरी मिळाली. त्यांच्या हत्येला एका रस्ते अपघाताचे स्वरुप देण्यासाठी ३ जुलै रोजी जयपूरमधील प्रताप नगर भागात 'स्कॉर्पिओ' गाडी मुद्दाम त्यांच्या अंगावर घालून त्यांना चिरडण्यात आले होते. या प्रकरणात आयुषीसह सात जणांना अटक करण्यात आली असून बलरामचा शोध अद्याप सुरु आहे.
नीरज शर्माच्या भावाचे आरोप
ही नवीन तक्रार नीरज शर्मा यांचे भाऊ आणि आयुषीचे मामा राकेश शर्मा यांनी दाखल केली आहे. त्यांनी विजय शर्मा यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी यासाठी पोलीस आणि न्यायालय या दोघांकडेही धाव घेतली आहे. राकेश यांचा आरोप आहे की, राजस्थान उच्च न्यायालयात 'कोर्ट मास्टर' म्हणून कार्यरत असलेले विजय आजारी असले तरी त्यांची प्रकृती सुधारत होती; मात्र आयुषीने त्यांना योग्य वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखले.
त्यांनी असा दावा केला की, आयुषीने तिचा चुलतभाऊ बलराम याच्या मदतीने विजय यांना अधिक चांगले उपचार मिळवून देण्याचे कारण सांगून घराबाहेर नेले, परंतु त्यानंतर जवळपास तीन महिने ते कुठे आहेत, याची माहिती तिने लपवून ठेवली होती.
विजय शर्मांचा संशयास्पद मृत्यू
तक्रारीनुसार, आयुषीने नंतर कुटुंबाला कळवले की वडिलांना जयपूरमधील निविक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेव्हा नातेवाईक रुग्णालयात पोहोचले, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्याच्या शरीराचा जवळपास ९० टक्के भाग गंभीरपणे भाजला होता. त्यानंतर आयुषी विजय शर्मांना घरी घेऊन आली, मात्र नंतर त्याचा मृत्यू झाला.
राकेशने असाही आरोप केला की, आयुषी आणि बलराम यांनी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले आणि विजय यांच्या मृत्यूनंतर लगेचच आयुषीने आपल्या वडिलांच्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची घोषणा केली. तसेच कुटुंबाची मालमत्ता आपल्या नावावर हस्तांतरित करण्याचा आग्रहही तिने धरला.लेकीची धमकी आईचे व्हॉट्सअप स्टेटस
एका वादादरम्यान आयुषीने तिच्या आईला धमकावले होते, की जर तिच्या वडिलांना 'फीडिंग ट्यूब' काढून टाकून मारले जाऊ शकत असेल, तर तिला मारणे अधिकच सोपे ठरेल, असा दावाही राकेशने केला. त्यानंतर नीरजने व्हॉट्सॲपवर एक 'स्टेटस' ठेवले होते, ज्यातून असे सूचित होत होते की तिच्याकडे जगण्यासाठी केवळ दोनच दिवस उरले आहेत.
२०२४ मध्ये विजय शर्मांना 'ब्रेन हॅमरेज' झाल्यानंतर आयुषीने त्यांच्या उपचारांची माहिती लपवून ठेवली होती. तसेच एप्रिल २०२५ मध्ये त्यांच्या मृत्यूच्या काही काळ आधी रुग्णालयात दाखल करेपर्यंत तिने वडिलांना एका अज्ञात ठिकाणी ठेवले होते.
भावाला अधिक प्रेम, आयुषीला मत्सर
हत्येच्या प्रकरणातील चौकशीदरम्यान आयुषीने पोलिसांना सांगितले की, आपल्या दिव्यांग भावाच्या तुलनेत आपल्याला कमी प्रेम मिळते या भावनेमुळे तिच्या मनात आईबद्दल दीर्घकाळापासून राग होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने बलरामसोबत मिळून आईच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली; तसेच कौटुंबिक मालमत्तेचे वाद आणि मनातील तीव्र द्वेष ही यामागची कारणे असल्याचे तिने सांगितले. एलएलबीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या आयुषीला कायद्याची चांगली जाण असून ती अत्यंत धूर्त स्वभावाची असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच तिच्या चौकशीत मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त रंजिता शर्मा यांनी सांगितले की, विजय शर्माच्या मृत्यूबाबत नीरज शर्माच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची सध्या सुरु असलेल्या तपासाचा भाग म्हणून तपासणी केली जाईल. नव्या तपासाच्या निष्कर्षांवरून हे ठरेल की, पोलीस विजय शर्मांच्या मृत्यूसंदर्भात स्वतंत्र गुन्हा दाखल होणार की नाही.


COMMENTS