तेहरान: इराणची राजधानी तेहरानची सकाळ लाखो नागरिकांची गर्दी, काळ्या कपड्यांतील शोकाकुल चेहरे आणि प्रार्थनांच्या आवाजाने सुरू झाली. इराणचे म...
तेहरान: इराणची राजधानी तेहरानची सकाळ लाखो नागरिकांची गर्दी, काळ्या कपड्यांतील शोकाकुल चेहरे आणि प्रार्थनांच्या आवाजाने सुरू झाली. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोक इमाम खोमेनी ग्रँड मोसल्ला संकुलात जमले होते.
जाहराची शवपेटी इराणच्या राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आली होती. तिच्या शेजारी तिचा एक फोटो ठेवण्यात आला होता. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येणारे नागरिक काही क्षण त्या फोटोसमोर थांबत, त्याच्याकडे पाहत आणि नंतर शांतपणे पुढे जात होते.
समारंभात खामेनेई यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचे जावई, मोठी मुलगी तसेच इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनेई यांच्या पत्नी यांच्या शवपेट्याही त्याच ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण पसरले होते.
श्रद्धांजलीवेळी नेतेही झाले भावूक
श्रद्धांजली समारंभादरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनाही भावना अनावर झाल्या आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ, वरिष्ठ लष्करी अधिकारी, धार्मिक नेते तसेच जगातील अनेक देशांमधून आलेल्या प्रतिनिधींनी अयातुल्ला खामेनेई यांना श्रद्धांजली अर्पण केली.आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आले होते. मात्र या प्रचंड जनसागरात एक असे दृश्य होते, ज्याने उपस्थित प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले.
अयातुल्ला खामेनेई यांच्या शवपेटीच्या अगदी शेजारी सुमारे 10 किलो वजनाची एक अतिशय छोटी शवपेटी ठेवण्यात आली होती. ती कोणत्याही सैनिकाची किंवा मोठ्या नेत्याची नव्हती, तर त्यांच्या अवघ्या 14 महिन्यांच्या नात जाहरा मोहम्मदी गोलपायेगानी हिची होती. या छोट्याशा शवपेटीचे वजन जरी कमी असले, तरी तिच्यामागील दुःख अत्यंत मोठे होते. अनेकजण शांतपणे त्या शवपेटीकडे पाहत उभे राहिले तर अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या वेळी उपस्थित नागरिकांनी अमेरिकेविरोधात घोषणाबाजी करत सूडाची मागणी केली.
14 महिन्यांच्या जाहराचा मृत्यू कसा झाला?
इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये त्यांची 14 महिन्यांची नात जाहरा मोहम्मदी गोलपायेगानी हिचाही समावेश होता.
इराणमध्ये हा अंत्यसंस्कार कार्यक्रम अनेक दिवस चालणार आहे. 5 ते 7 जुलैदरम्यान तेहरान आणि कोम येथे सार्वजनिक श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर 9 जुलै रोजी खामेनेई यांच्यावर त्यांच्या मूळ गावी मशहद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तेहरानमध्ये अमेरिकेविरोधात घोषणाबाजी
अंतिम दर्शनासाठी लाखो लोक उपस्थित असले तरी सर्वाधिक भावनिक करणारे दृश्य म्हणजे 14 महिन्यांच्या निरागस बालिकेची छोटी शवपेटी होते. या दृश्यामुळे संपूर्ण तेहरान शोकमग्न झाले. मात्र शोकसभेत जमलेली गर्दी केवळ अश्रू ढाळत नव्हती. अल जझीराच्या वृत्तानुसार तेहरानमध्ये अमेरिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी सूड उगवण्याची मागणी केली.
दुसरीकडे अमेरिका आपल्या स्वातंत्र्याच्या 250 व्या वर्धापनदिनाचा उत्सव साजरा करत आहे. तर इराणवरील कारवाईला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या प्रमुख कामगिरींपैकी एक मानत असल्याचेही सांगितले जात आहे.


COMMENTS