T20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आयर्लंड सारख्या टीमने भारताला टी 20 मालिकेत 2-0 ने लोळवलं. खरंतर मालिका सुरु होण...
T20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आयर्लंड सारख्या टीमने भारताला टी 20 मालिकेत 2-0 ने लोळवलं. खरंतर मालिका सुरु होण्याआधी टीम इंडिया ही सीरीज सहज जिंकेलं असं वाटलं होतं.पण मोठा उलटफेर घडला आहे. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला आयर्लंडकडून 1 रन्सने पराभव स्वीकारावा लागला. संपूर्ण सामन्यात आयर्लंडचीच टीम वरचढ ठरताना दिसली. आयर्लंडने भारताला विजयासाठी 155 धावांचं टार्गेट दिलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय टीमला 20 ओव्हर्समध्ये 153 धावाचं करता आल्या. टीम इंडियाला हरवण्यात भारतीय वंशाच्या जय मूंदडाने कमाल केली. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन भारताला बॅकफूटवर ढकललं. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन तर या मॅचमध्ये खातही उघडू शकले नाहीत.
भारताची टॉप ऑर्डर तंबूत परतल्यानंतर मधल्या षटकात तिलक वर्मा आणि शिवम दुबेने चांगली भागीदारी केली. त्यामुळे विजयाच्या आशा निर्माण झाल्या. तिलक 55 रन्सवर आऊट झाला, त्यावेळी तर सामना पूर्णपणे भारताच्या नियंत्रणातून गेला. भारत हा सामना जिंकेल, असं त्यावेळी कोणालाही वाटलं नाही. पण क्रिकेट मध्ये कधीही काहीही घडू शकतं, तेच झालं. हर्षित राणाने जय मूंदडाच्या 19 व्या ओव्हरमध्ये 10 रन्स करुन मॅचमध्ये रोमांच निर्माण केला. टीम इंडिया जिंकू शकते असं वाटलं. भारतीय चाहत्यांच्या मनात विजयाची आशा निर्माण झाली. 19 वी ओव्हर संपली तेव्हा भारताच्या 8 बाद 135 धावा होत्या. टीम इंडियाला लास्ट ओव्हरमध्ये विजयासाठी 20 धावांची गरज होती. स्ट्राइकवर अर्शदीप होता.
पुढचा चेंडू फ्री हिट होता
20 वी ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजाने बऱ्याच चूका केल्या. त्यामुळे भारताला विजयाची जास्त संधी निर्माण झाली. 6 चेंडूत विजयासाठी 20 धावा हव्या होत्या. एक वाइड बॉल टाकला. त्यानंतर अर्शदीपने पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली. 5 चेंडूत 18 धावांची गरज होती. हर्षित राणा स्ट्राइकवर आलेला. हॅरि टेक्टरने ओव्हरचा दुसरा चेंडू फुलटॉस टाकला. तो नो बॉल होता. त्या चेंडूवर तीन धावा मिळाल्या. पुढचा चेंडू फ्री हिट होता. त्यानंतरच्या चेंडूवर हर्षितला चौकार मिळाला. भारत मॅच जिंकेल असं वाटू लागलं.
पण, तो पर्यंत उशिर झालेला
लास्ट ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षितने एक रन्स काढला. अर्शदीप पुढच्या चेंडूवर स्ट्राइकवर होता. चौथ्या चेंडूवर अर्शदीपन एक धाव काढून स्ट्राइक हर्षितला दिला. 2 चेंडूत भारताला विजयासाठी 8 धावांची गरज होती. हॅरि टेक्टरने पाचवा चेंडू फुलटॉस टाकला. त्यावर हर्षितने जोरदार हवाई फटका मारला. सर्वांना वाटलं चेंडू सीमारेषेपार गेला. पण असं घडलं नाही. टायमिंग परफेक्ट नव्हता. सीमारेषेवर हर्षित कॅच आऊट झाला. भारताच्या अपेक्षा संपलेल्या. त्यानंतरच्या चेंडूवर प्रिन्स यादवने एक सिक्स मारला. पण सामना भारताने एक रन्सने गमावलेला.


COMMENTS