पिंपरी चिंचवड : चिखलीतील कुदळवाडी परिसरातील श्री महादेव मंदिराजवळील भंगार गोदामांना मंगळवारी (ता. २३) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागल...
पिंपरी चिंचवड : चिखलीतील कुदळवाडी परिसरातील श्री महादेव मंदिराजवळील भंगार गोदामांना मंगळवारी (ता. २३) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. परिणामी काही नागरिकांना त्रास झाला.पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
येथील सुमारे दोन एकर परिसरात रबर, प्लास्टिक व इतर भंगार मालाची गोदामे आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चिखली, तळवडे, मोशी, भोसरी, पिंपरी, नेहरूनगर, प्राधिकरण आणि थेरगाव येथील केंद्रांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. आग मोठी असल्याने चिखली आणि टाटा मोटर्स परिसरातील पंपिंग स्टेशनवरून अनेकदा पाणी भरून आणावे लागले. केंद्र अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ६० जवान व कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.
अरुंद मार्गामुळे अडचणी
भंगार गोदामे एकमेकांना लागून असल्याने तसेच परिसरातील रस्ते वळणावळणाचे व अरुंद गल्लीबोळ असल्याने बंब दुर्घटनास्थळापर्यंत पोहोचण्यात अडचणी आल्या. सुरक्षित अंतरावरून 'फायर होज लाईन' टाकण्यात आली.
बघ्यांची गर्दी
आगीचे व्हिडिओ तयार करण्यासाठी व आग पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली. त्यामुळेही अग्निशमन वाहनांना पोहोचण्यात अडथळे येत होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेण्यात आली.
नागरिकांना हलविले
या परिसरात निवासी घरे असल्याने दहा ते बारा नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. घरे आणि मालमत्तेला आगीची झळ बसू नये म्हणून त्या दिशेने पाण्याचे फवारे मारून प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. या भागातील वीजपुरवठाही तात्पुरता खंडित करण्यात आला होता.
आगीच्या धुराचे धोके
रबर आणि प्लॅस्टिकला आग लागल्यास
अत्यंत विषारी धूर बाहेर पडतो
धुरात कार्बन मोनोऑक्साइड, डायऑक्सिन यांसारखे घातक वायू
धूर नाकात गेल्यामुळे डोळे, नाक आणि घशाची जळजळ होते
श्वास घ्यायला त्रास होणे
मळमळणे, डोकेदुखी, चक्कर येऊ शकते
गुदमरल्यासारखे वाटून त्रास होतो
धुराच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यास किंवा जास्त धूर फुफ्फुसात गेल्यास गंभीर परिणाम
ही आग मोठी होती. काही वेळातच परिसरात बराच धूर पसरला. सिलिंडरचा स्फोट झाल्यासारखा आवाज आला.


COMMENTS