देशभरात रविवारी नीट-यूजी २०२६ परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात आली असताना राजस्थानमधील अजमेर येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीने गोंधळ...
देशभरात रविवारी नीट-यूजी २०२६ परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात आली असताना राजस्थानमधील अजमेर येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीने गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली. संबंधित विद्यार्थिनीने बुरखा परिधान करून आल्यानंतर प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप केला.मात्र, या विद्यार्थिनीने बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसेल तर मी परीक्षा देणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच माझ्यासाठी परीक्षेपेक्षा बुरखा महत्त्वाचा असल्याचेही तिने म्हटले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुलसुम बानो असे विद्यार्थिनीचे नाव आहे. कुलसुमने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मी ब्यावर येथून परीक्षा देण्यासाठी आली आहे. दरम्यान, ३ मे रोजी झालेल्या परीक्षेलाही मी बुरखाच परिधान केला होता. मात्र, त्यावेळी मला परवानगी देण्यात आली. परंतु, आता प्रेवश का नाकारला जात आहे? सुरुवातीला केंद्रावरील अधिकाऱ्यांनी मला दुपट्टा काढण्यास सांगितले. त्यानंतर बुरखाही काढण्याचा आग्रह धरण्यात आला.
पुढे कुलसुम बानो म्हणाली की, "जर एनटीएने अशा पोशाखाला परवानगी दिली असेल, तर कोणालाही आम्हाला अडवण्याचा अधिकार नाही. जर मला या कपड्यांमध्ये परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसेल, तर मी परीक्षा देणार नाही. १८ वर्षांच्या विद्यार्थ्यांशी अशा प्रकारे वागणे लाजिरवाणे आहे. माझ्यासाठी परीक्षा महत्त्वाची नाही, माझ्यासाठी माझा बुरखा आणि माझी ओळख अधिक महत्त्वाची आहे." दरम्यान, या घटनेनंतर परीक्षा केंद्रावरील नियम, सुरक्षा तपासणी आणि धार्मिक पोशाखांबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


COMMENTS