मुंबई : जेईई ऍडव्हान्स्ड 2026 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी आयआयटी (IIT) दिल्ली झोनच्या तीन उमेदवारांनी कॉमन रँक लिस्टमध्...
मुंबई : जेईई ऍडव्हान्स्ड 2026 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी आयआयटी (IIT) दिल्ली झोनच्या तीन उमेदवारांनी कॉमन रँक लिस्टमध्ये टॉप 3 रँक पटकावले आहेत. जेईई ऍडव्हान्स्ड 2026 मध्ये आयआयटी दिल्ली झोनच्या शुभम कुमारने ऑल इंडिया रँक (AIR) 1 म्हणजे अव्वल स्थान मिळवले आहे.
तर महिलांमध्ये आरोही देशपांडे या विद्यार्थिनीने अव्वल स्थान पटकावले आहे. आयआयटी दिल्ली झोनच्या शुभम कुमारने 360 पैकी 330 गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला. तसेच, कबीर छिल्लर आणि जतिन चाहर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.
जेईई ऍडव्हान्स्डच्या निकालानुसार, सुमारे 55 हजार विद्यार्थी देशातील 23 आयआयटीमधील बी-टेक, इंटिग्रेटेड एम-टेक आणि ड्युअल डिग्री अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठीच्या समुपदेशनासाठी पात्र ठरले आहेत. वेळापत्रकानुसार, निकाल सोमवारी (1 जून) सकाळी 10 वाजता जाहीर होणार होता, परंतु तो रविवारी (31 मे) मध्यरात्री 2.30 वाजताच जाहीर करण्यात आला. ही परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) रुरकीने घेतली होती. गेल्या वर्षी पात्रता कटऑफ 74 गुण होती, जी आता वाढून 92 गुण झाली आहे. या वर्षी कोणताही प्रश्न बोनस म्हणून घोषित केलेला नाही. रसायनशास्त्र आणि गणित विषयाच्या पेपरमध्ये कोणतीही चूक नाही.
असा आहे महाराष्ट्राचा निकाल
जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेच्या निकालात महाराष्ट्रानेही चांगली कामगिरी केली आहे. भारतातील अव्वल 500चा विचार करता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा वाटा 10 टक्के असून अव्वल 1000 मध्येच हा वाटा 10.5 टक्के इतका आहे. दरम्यान, राज्यातून सर्वाधिक गुण हे नागपूरच्या माधव साधुराम नोटानी मिळवल्याचे समोर आले असून 360 पैकी 300 गुण मिळवले आहेत. जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेत 56,880 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी जेईई ऍडव्हान्स्ड 2026 परीक्षेसाठी एकूण 1 लाख 87 हजार 389 अर्ज आले होते. तर परीक्षेला 1 लाख 79 हजार 694 विद्यार्थी उपस्थित राहिले होते. ही परीक्षा 17 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स्ड 2026ची परीक्षा दिली आहे, ते जेईई ऍडव्हान्स्डच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले स्कोअरकार्ड पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर आवश्यक आहे.


COMMENTS