मोहरमच्या जुलूसमध्ये 26 जून रोजी विषारी कॅप्सूल वाटल्याप्रकरणी अटक केलेल्या फैयाज निसार हुसेन प्रेमजीला न्यायालयाने सोमवारी 4 जुलैपर्यंत प...
मोहरमच्या जुलूसमध्ये 26 जून रोजी विषारी कॅप्सूल वाटल्याप्रकरणी अटक केलेल्या फैयाज निसार हुसेन प्रेमजीला न्यायालयाने सोमवारी 4 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पोलिसांना फैयाजकडून यासंदर्भातील अधिक माहिती काढता येणार आहे.असं असतानाच दुसरीकडे, फैयाजने तपासादरम्यान स्वतःच्या समाजातील काही रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धांविरोधातील आजोबांच्या विचारांचा स्वतःवर प्रभाव पडल्याचा दावा केला आहे. फैयाज त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्याने आपण टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती फैयाजने पोलिसांना दिल्याचं समोर येत आहे. फैयाज प्रकरणामध्ये गुजरात कनेक्शनसोबतच मध्य प्रदेश कनेक्शन समोर आलं असून फैयाजचं कुटुंबं पुण्यात का राहायला आलेलं हे ही समोर आलं आहे.
आजोबांपासून झाला प्रभावित
आरोपीने तपासात दिलेल्या माहितीनुसार, त्याचे आईचे-वडील अब्बास अली रजब अली चारानिया हे स्वतःच्याच समाजातील काही चालीरीती, रुढी आणि अंधश्रद्धांचे विरोधक होते. त्यांनी गुजरातमधील महुआ येथे याविरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. या विचारांची माहिती मामांकडून मिळाली असून, त्याच विचारांनी आपण प्रभावित झाल्याचे फैयाज पोलीस चौकशीमध्ये म्हटले आहे. पण 2016 मध्ये त्याच्या आजोबांचा मृत्यू झाला.
धार्मिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न
आजोबांच्या विचाराने प्रभावित झालेल्या फय्याजने 2015-16 च्या सुमारास काही व्यक्तींसोबत मिळून समाजात धार्मिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, त्याला समाजाकडून फारसा पाठिंबा मिळाला नाही. तर 2016 मध्ये त्याची पत्नीही त्याला सोडून गेली. त्याच्यापाठोपाठ त्याच्या भावाचीही पत्नी सोडून गेली. 2019 मध्ये त्याने इस्लाम धर्माचा त्याग करून स्वतःला नास्तिक आणि 'एक्स-मुस्लीम' म्हणून जाहीर केले. पोलिस सर्व बाबींचा कसून तपास करत आहे. यामध्ये तो एकटच सगळं करत आहे की सोबत आणखी कोणी आहे? या सर्व बाजूने तपास सुरू आहे.
बँक व्यवहारांची माहिती काढण्यास सुरुवात
पोलिसांनी फैयाजच्या बँक व्यवहाराची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्याने ऑनलाइन मागविलेले झिंक फॉस्फाइड आणि कॅप्सूल परराज्यातून होते. त्यामुळे त्याच्या मुख्य पुरवठादाराच्या शोधासाठी पथक मुंबईबाहेर रवाना झाले आहे. आरोपीने चौकशीत यापूर्वी खोजा शिया समाजाची निवडणूक लढवली होती, मात्र त्यात पराभव झाल्याची कबुली दिली आहे. निवडणुकीतील पराभवानंतर तो आपल्या समुदायावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
... म्हणून पुण्यात स्थायिक
मूळचे गुजरातचे रहिवासी असलेला फैयाजचे आई-वडील, भाऊ आणि दोन बहिणींसोबत असे कुटुंब आहे. 1988 मध्ये वडिलांनी रंग बनविण्याचा व्यवसायासाठी सिकंदराबाद येथे गेले होते. 1988 ते 1992 पर्यंत सिकंदराबाद येथे राहिले. त्याच्या दोन्ही बहिणींचा जन्म सिकंदराबादचा आहे. पुढे व्यवसाय चालत नसल्याने त्यांनी नातेवाइकांच्या सांगण्यावरून 1992 मध्ये पुणे गाठले. काही वर्ष भाड्याने राहिल्यानंतर 1998 मध्ये त्यांनी स्वतःचे घर घेत तिथेच स्थायिक झाले.
मध्यप्रदेश कनेक्शनही समोर
भायखळा झिंक फॉस्फाईड कॅप्सूल प्रकरणात मध्यप्रदेश कनेक्शनही समोर आलं आहे. आरोपी फैयाजने झिंक फॉस्फाईड मध्य प्रदेशातून ऑनलाइन मागवले होते. इंदूरमधील एका पुरवठादाराकडून 40 किलोहून अधिक झिंक फॉस्फाईडची ऑनलाइन खरेदी फैयाजने केली होती. झिंक फॉस्फाईडसाठी सुमारे 15 हजार रुपयांचा खर्च फैयाजने केलेला. इंदूरमधील दुसऱ्या पुरवठादाराकडून मोठ्या प्रमाणात रिकाम्या कॅप्सूलचीही खरेदी त्याने केलेली. कॅप्सूल खरेदीसाठी फैयाजने सुमारे 30 हजार रुपये खर्च केले होते. पेमेंट आणि डिलिव्हरी रेकॉर्डच्या आधारे संपूर्ण सप्लाय चेनचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात पुरवठादारांना आरोपीच्या हेतूची माहिती असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. ही खरेदी सामान्य व्यावसायिक व्यवहारातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे.


COMMENTS