पुणे : पुणे शहरातील विविध भागांमध्ये विंकेडला विविध पार्ट्यांचे आयोजन केले जात असून, अनेक युवक-युवतींचा धिंगाना पाहायला मिळत आहे. आळंदी-मर...
पुणे : पुणे शहरातील विविध भागांमध्ये विंकेडला विविध पार्ट्यांचे आयोजन केले जात असून, अनेक युवक-युवतींचा धिंगाना पाहायला मिळत आहे. आळंदी-मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात मध्यरात्री सुरू असलेल्या हाय-प्रॉफाईल (High-profile) पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी (ता.७) रात्री उशिरा छापा टाकला. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या पार्टीला "प्रोजेक्ट एक्स" (Project X) असे नाव देण्यात आले होते. या छाप्यात सुमारे 107 पुरुष आणि 49 महिला उपस्थित असल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे.
तुळापूर येथील एका बंगल्यात शनिवारच्या रात्री मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी एकत्र जमल्याची आणि तिथे अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. माहिती मिळताच क्राईम ब्रँचच्या 15 अधिकारी आणि 65 हवालदारांच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास या बंगल्याला वेढा घातला आणि अचानक छापा टाकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा वापर झाल्याचा तीव्र संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून नशेसाठी वापरले जाणारे काही संशयास्पद पदार्थ जप्त केले आहेत. तसेच, पार्टीत उपस्थित असलेले काही तरुण-तरुणी पोलिसांना नशेच्या अवस्थेत आढळून आले. याशिवाय, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोणतीही परवानगी न घेता तिथे विनापरवाना मद्यविक्री सुरू होती, तसेच हाय-डेसिबल साऊंड सिस्टिमचा वापर करून मध्यरात्रीपर्यंत धांगडधिंगा सुरू होता. अशा व्यावसायिक किंवा हाऊस पार्टीसाठी पोलीस आणि एक्साईज (Excise) विभागाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, आयोजकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून या पार्टीचे आयोजन केले होते. सध्या पोलिसांनी जप्त केलेले संशयास्पद पदार्थ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. पार्टीमधील तरुण-तरुणींसह या 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीच्या मुख्य आयोजकांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, आणि हे अंमली पदार्थ कुठून आणले गेले, याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या धक्कादायक प्रकारामुळे पुणे शहर आणि परिसरात पुन्हा एकदा ड्रग्ज आणि बेकायदेशीर पार्ट्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईत 15 अधिकारी आणि 65 हवालदारांच्या पथकाने 107 पुरुष आणि 49 महिलांना ताब्यात घेतले आहे. यापैकी 3 जण अल्पवयीन असल्याचे समोर आले. पोलिसांनी सुमारे 3 ग्रॅम गांजा, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स आणि अंदाजे 9.22 लाखांची दारू जप्त केली. या प्रकरणात आयमान शेख आणि यश चौधरी हे मुख्य आयोजक असल्याचे समोर आले असून एकूण सुमारे 85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS