राज्यातील कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, तसेच कृष...
राज्यातील कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारने २०२३ व २०२४ चे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत.कृषी दिनाचे औचित्य साधून १ जुलै रोजी मुंबई येथे हा सोहळा होणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समिती बैठकीत पुरस्कारार्थीची निवड करण्यात आली असून, शासनाने त्यास मान्यता दिली आहे.
राज्यातील कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार, उत्पादनवाढ, शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, फलोत्पादन आणि कृषी विस्तार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतात.
भरणे म्हणाले, 'कृषी विभागाने राज्यातील विविध विभागांमधून कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या पुरस्कारार्थ्यांची निवड केली आहे. १ जुलै रोजी २०२३ व २०२४ या दोन्ही वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कार विजेत्यांचा सन्मान एकत्रितपणे केला जाणार आहे.'
पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार असे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट), तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार आदी पुरस्कार देण्यात येणार आहेत.
२०२३ व २०२४ साठी वरील पुरस्कारांसाठी एकूण १८९ पुरस्कार देण्यात येत आहे.


COMMENTS