प्रतिनिधी/ बोतार्डे (जुन्नर) बोतार्डे (ता. जुन्नर, जि. पुणे) ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठा कर्मचारी भरती प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे....
प्रतिनिधी/ बोतार्डे (जुन्नर)
बोतार्डे (ता. जुन्नर, जि. पुणे) ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठा कर्मचारी भरती प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. या भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जागरूक नागरिक सतिश संतोष शिंदे यांनी प्रशासनाकडे लेखी अर्ज दाखल केला होता. मात्र, ग्रामसेवक प्रकाश नांगरे यांनी या गंभीर अर्जावर अतिशय त्रोटक आणि असमाधानकारक उत्तर देऊन सतिश शिंदे यांची निव्वळ बोळवण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामसेवकांच्या या बेजबाबदार भूमिकेमुळे सतिश शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नेमके प्रकरण काय?
बोतार्डे ग्रामपंचायत हद्दीत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी कर्मचारी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीमध्ये नेमके कोणते नियम पाळले गेले, पात्रता काय होती आणि जाहिरात कुठे प्रसिद्ध केली, या संदर्भात सतिश संतोष शिंदे यांनी १८ जुलै २०२५ रोजी अधिकृत अर्ज देऊन लेखी माहिती मागवली होती. या भरतीत नेमके काय निकष लावले गेले, हे समोर येण्यासाठी शिंदे यांनी या संदर्भात कायदेशीर उत्तरे मागितली होती.
'लेखी उत्तर देऊ' म्हणत ग्रामसेवकाची थातूरमातूर उडवाउडवी
नागरिकांच्या अर्जाला मुदतीत व योग्य पुराव्यासह उत्तर देणे हे 'दप्तर दिरंगाई कायद्यानुसार' बंधनकारक आहे. मात्र, ग्रामसेवक प्रकाश नांगरे यांनी मुख्य प्रश्नांना बगल देत, "तुम्हाला अर्जाचे लेखी उत्तर देऊ" असे केवळ वेळ मारून नेणारे थातूरमातूर उत्तर तोंडी व जुजबी स्वरूपात दिले. मूळ अर्जावर ठोस कारवाई किंवा स्पष्टीकरण देण्याऐवजी फक्त आश्वासन देऊन कागदी घोडे नाचवण्याचा आणि अर्जदाराची बोळवण करण्याचा प्रयत्न ग्रामसेवकांनी केला आहे, असा थेट आरोप सतिश शिंदे यांनी केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागणार; आंदोलनाचा इशारा
ग्रामसेवकांच्या या मनमानी कारभारामुळे बोतार्डे येथील पाणीपुरवठा कर्मचारी भरतीतील संशय अधिकच बळावला आहे. या प्रकरणी सतिश संतोष शिंदे हे स्वतः [जुन्नर पंचायत समितीचे](https://psjunnar.com/) गट विकास अधिकारी (BDO) आणि [पुणे जिल्हा परिषदेच्या](https://www.punezp.gov.in/junnar/) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (CEO) पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल करणार आहेत. ग्रामसेवक नांगरे यांच्यावर प्रशासकीय दिरंगाई व माहिती लपवल्याबद्दल तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी आणि या संपूर्ण भरतीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी सतिश शिंदे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


COMMENTS