मोठा पगार मिळणारी नोकरी मिळाली म्हणजे आयुष्यात सुख मिळेलच, याची खात्री नसते. जर तुम्हाला आयुष्यात खरंच सुखी व्हायचं असेल, तर आपल्या आवडत्य...
मोठा पगार मिळणारी नोकरी मिळाली म्हणजे आयुष्यात सुख मिळेलच, याची खात्री नसते. जर तुम्हाला आयुष्यात खरंच सुखी व्हायचं असेल, तर आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करा.हीच गोष्ट सलाहोद्दीन अब्दुल-काफी यांनी सिद्ध करून दाखवली. त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून ३७.८ कोटी रुपयांची उलाढाल करणारा रेस्टॉरंट व्यवसाय उभा केला.
चीनमधील महान विचारवंत कन्फ्युशियस म्हणाले होते, "सुखी आयुष्य जगायचं असेल, तर आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करा. मग तुमचा प्रत्येक दिवस आनंदाने जाईल." त्यांचे हे विचार आजच्या तंत्रज्ञानाच्या जगातही तंतोतंत खरे ठरताना दिसत आहेत. त्यांच्या याच विचारांवर पाऊल ठेवत एका व्यक्तीने कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा केला.
आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की, नोकरीमध्ये पगार वाढला की सर्व समस्या संपतील आणि आयुष्य सुखी होईल. पण हा निव्वळ भ्रम असल्याचा अनुभव या व्हायरल होत असलेल्या टेक इंजिनिअरने सांगितला आहे. हा व्यक्ती तब्बल ४.२ कोटी रुपयांचा वार्षिक पगार असलेली नोकरी करत होता. पण तरीही तो आपल्या कामात समाधानी नव्हता. अखेर त्याने नोकरीला वैतागून एक दिवस राजीनामा दिला आणि स्वतःचं हॉटेल सुरू केलं. विशेष म्हणजे, आवडीच्या क्षेत्रात काम करून आज तो तब्बल ३७.८ कोटी रुपयांची उलाढाल करण्याच्या मार्गावर आहे. पण गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि यूट्यूबसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारा हा इंजिनिअर नेमका कोण आहे? चला जाणून घेऊया, कसा उभा राहिला त्याचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय.सोडली नोकरी अन् उभा केला बिझनेस
या अमेरिकन उद्योजकाचं नाव सलाहोद्दीन अब्दुल-काफी आहे. हा ३५ वर्षीय उद्योजक गेली १४ वर्षे गुगल, मायक्रोसॉफ्ट, यूट्यूब आणि इतर मोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर काम करत होता. या नोकरीत त्याला वर्षाला जवळपास ४.२ कोटी रुपयांचा पगार मिळत होता. सामान्य माणसाच्या दृष्टीने हा पगार सुखी आयुष्यासाठी पुरेसा होता. पण सलाहोद्दीन अब्दुल-काफी आपल्या करिअरमध्ये समाधानी नव्हते. त्यांचं मन स्वयंपाकात अधिक रमायचं आणि या क्षेत्रात त्यांना विशेष गती होती. एकदा त्यांनी मित्रमंडळींना घरी जेवणासाठी बोलावलं आणि बार्बेक्यू पदार्थ बनवले. हे पदार्थ मित्रांना इतके आवडले की त्यांनी रेस्टॉरंट सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी विचारपूर्वक करिअरमध्ये मोठा बदल करत 'Kafi BBQ' नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं.
पहिल्याच वर्षी कोट्यवधींची उलाढाल
सलाहोद्दीन अब्दुल-काफी यांच्या हाताला खरंच चव आहे, याची पावती ग्राहकांनीच दिली. पहिल्याच वर्षी त्यांच्या रेस्टॉरंटने तब्बल २१.७ कोटी रुपयांची उलाढाल केली. तर यंदा ही उलाढाल ३७.८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
(फोटो सौजन्य - cottonbro studio/pexels.com)
रेस्टॉरंट चालवायला किती खर्च येतो?
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी रेस्टॉरंटचं संपूर्ण आर्थिक गणित सांगितलं. रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी त्यांनी सुमारे १० लाख डॉलर गुंतवले. शिवाय अन्नधान्य, कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे, मार्केटिंग आणि इतर खर्च मिळून दरमहा सुमारे ४.०५ लाख डॉलर खर्च होतो. त्यामुळे व्यवसायाची उलाढाल वाढत असली, तरी सुरुवातीची गुंतवणूक अद्याप पूर्णपणे वसूल झालेली नाही. मात्र, ग्राहकांकडून मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता भविष्यात 'Kafi BBQ' हा अमेरिकेतील एक लोकप्रिय फूड ब्रँड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या यशोगाथेने नोकरीला कंटाळलेल्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांना प्रेरणा दिली आहे.
(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता crimenama live ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)


COMMENTS