दिल्लीहून अमृतसरसाठी उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि एका मोठ्या चुकीमुळे हे विमान थेट पाकिस्तानच्या ...
दिल्लीहून अमृतसरसाठी उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि एका मोठ्या चुकीमुळे हे विमान थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध पाहता ही घटना अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलने या विमानाबाबत तात्काळ भारतीय यंत्रणांना इशारा दिला. त्यानंतर तातडीने समन्वय साधून विमानाचा मार्ग बदलण्यात आला आणि ते पुन्हा भारतीय हद्दीत आणले गेले. या संपूर्ण हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे विमानातील प्रवाशांचा जीव काही काळ टांगणीला लागला होता.
तांत्रिक बिघाडामुळे भरकटले 'एअरबस ए-३२१'
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे 'एआय-४७९' हे एअरबस ए-३२१ विमान दिल्लीहून अमृतसरसाठी नियमित प्रवाशांना घेऊन रवाना झाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानातील यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे विमानाचा दिशादर्शक मार्ग विस्कळीत झाला आणि विमान आपल्या निर्धारित एअर कॉरिडोअरमधून भरकटले. हवेतच दिशा चुकल्यामुळे हे विमान थेट आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात दाखल झाले.
पाकिस्तान एटीसीचा इशारा आणि इमर्जन्सी डायव्हर्शन
भारतीय विमान आपल्या हद्दीत शिरल्याचे पाहताच पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणा सतर्क झाल्या. त्यांनी तातडीने भारतीय हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून याची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार आणि प्रोटोकॉलनुसार दोन्ही देशांच्या यंत्रणांनी तात्काळ परिस्थिती हाताळली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने विमान अमृतसरला नेण्याऐवजी तात्काळ दिल्लीच्या दिशेने वळवण्याचा निर्णय घेतला. दिल्ली विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले आणि तांत्रिक पथकाकडून त्याची कसून तपासणी करण्यात आली.
४ तास प्रवासी ताटकळले; चौकशीचे आदेश
दिल्लीत आवश्यक परवानग्या आणि विमानाची तांत्रिक दुरूस्ती पूर्ण झाल्यानंतर या विमानाने पुन्हा एकदा अमृतसरसाठी उड्डाण केले आणि बुधवारी पहाटे विमानाचे अमृतसरमध्ये सुरक्षित लँडिंग झाले. मात्र, या संपूर्ण गोंधळामुळे आणि अनपेक्षित संकटामुळे प्रवाशांना तब्बल चार तास ताटकळत राहावे लागले. भारत-पाकिस्तान सीमेवरील हवाई क्षेत्रावर दोन्ही देशांची अत्यंत कडक नजर असते, अशा वेळी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणे ही गंभीर घटना मानली जात आहे. सध्या नागरी विमानवाहतूक अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला जात असून तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला, याची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.


COMMENTS