मुंबई: शुक्रवारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोहरम साजरा करण्यात आला. हा सण मुस्लीम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. मात्र याच मोहरम...
मुंबई: शुक्रवारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोहरम साजरा करण्यात आला. हा सण मुस्लीम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. मात्र याच मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे.मुंबईत मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान नागरिकांना संशयास्पद कॅप्सूल (गोळ्या) वाटप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील रे रोड परिसरातील रेहमताबाद कब्रस्तानाजवळ ही घटना घडली असून, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमका काय आहे प्रकार?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोहरमच्या मिरवणुकीत चार अज्ञात व्यक्ती सहभागी झालेल्या नागरिकांना अचानक काही कॅप्सूल वाटत होत्या. मिरवणुकीत उपस्थित असलेल्या एका सतर्क महिलेला या प्रकाराबद्दल संशय आला. तिने तात्काळ त्या कॅप्सूल वाटणाऱ्या व्यक्तींकडे जात चौकशी केली. त्यावर संबंधित व्यक्तींनी ही कॅप्सूल "इम्युनिटी बूस्टर" (रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे) आणि "पेन किलर" (वेदना शामक) असल्याचा दावा केला.
महिलेच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
अशाप्रकारे ऐन मिरवणुकीत कॅप्सूल वाटल्याने तिचा संशय आणखी बळवला. त्यामुळे संबंधित महिलेने मिळालेली कॅप्सूल उघडून पाहिली. तेव्हा त्या कॅप्सूलमध्ये फिकट रंगाची पावडर आढळली. तिचा संशय आणखी वाढला. तिने वेळ न दवडता या प्रकाराची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. महिलेच्या या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळल्याचे बोललं जात आहे.
एका संशयिताला अटक
महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे, तर त्याचे इतर साथीदार फरार असल्याचं समजतं. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात संशयास्पद कॅप्सूलचा साठा जप्त केला आहे. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वीच अनेक नागरिकांना या कॅप्सूल वाटण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या कॅप्सूलपैकी काही गोळ्या घेतल्यानंतर काही लोकांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. एका व्यक्तीने ही गोळी खाल्ल्यानंतर त्याला तात्काळ उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याचं समोर आलं आहे.
फॉरेन्सिक तपासणी होणार
या कॅप्सूलमध्ये नेमकं कोणतं रासायनिक पदार्थ किंवा अंमली पदार्थ आहेत, हे शोधण्यासाठी पोलिसांनी जप्त केलेल्या कॅप्सूल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या आहेत. हे कॅप्सूल वाटण्यामागचा नेमका हेतू काय होता? हा एखाद्या कटाचा भाग होता का? यामागे कोणती टोळी सक्रिय आहे का? या सर्व बाजूने मुंबई पोलीस आता पुढील तपास करत आहेत.


COMMENTS